चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान या आगामी ऐतिहासिक मालिकेतून पराक्रम, नेतृत्व आणि शूर वारशाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या भव्य मालिकेत पृथ्वीराज चौहान राजाची एका युवा, भाबड्या राजकुमारापासून ते भारतातील एक महान योद्धा राजा बनण्याच्या प्रवासाची कहाणी उलगडणार आहे. या मालिकेतून पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) तब्बल ११ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ही मालिका सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर लवकरच भेटीला येणार आहे.
या मालिकेच्या राजेशाही थाटाला साजेशा राजमातेच्या शालीन भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे दिसणार आहेत. परंपरा आणि नवतेशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचा समतोल सांभाळत, आपल्या अढळ प्रेमाने आणि सूक्ष्मदृष्टीने ती भावी राजाला मार्गदर्शन देते. तिच्या उपस्थितीतच राज्याचा आत्मा आहे. आपल्या शांत दृढतेने आणि सखोल प्रभावाने तिने साम्राज्य जोडून ठेवले आहे.
याबद्दल पद्मिनी कोल्हापुरे म्हणाल्या की, चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान मालिकेत केवळ मी एक दमदार भूमिका करत असल्यामुळेच नाही, तर जवळजवळ ११ वर्षांनंतर मी टेलिव्हिजनवर परतत आहे .टेलिव्हिजनवरील माझ्या प्रवासाची सुरुवात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनपासूनच झाली होती आणि आता इतक्या वर्षांनी, या आव्हानात्मक आणि समाधान देणाऱ्या भूमिकेद्वारे मी पुन्हा त्याच वाहिनीवर परतत आहे. ही भूमिका जेव्हा मला देण्यात आली, तेव्हा राजमातेची व्यक्तिरेखा मला तात्काळ आपलीशी वाटली. इतकी सखोलता, ग्रेस आणि शांततेची ताकद दाखवणारी भूमिका क्वचितच करायला मिळते. ती केवळ एक राणी किंवा माता नाही- ती या राज्याचा आत्मा आहे.
''ही गौरवाची गोष्ट आहे''
त्या पुढे म्हणाल्या की, राजमाताची भूमिका करताना पडद्याच्या मागे राहून शांतपणे इतिहासाला आकार देणाऱ्या त्या सर्व खंबीर महिलांना आदारांजली वाहत असल्याची भावना मनात येते. तिचे पृथ्वीराजशी सुंदर नाते आहे. ती त्याची मार्गदर्शक, आधार आहे आणि तिचा त्याच्यावर मोठा प्रभाव आहे. अशी दमदार आणि बारकाईने रेखाटलेली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे ही गौरवाची गोष्ट आहे. मला आशा आहे की माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांना देखील तिचा प्रवास आपलासा वाटेल.