Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिशान जगणं सोडून घेतला संन्यास; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री मागतेय भिक्षा, मिळाले 21 रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 15:30 IST

Nupur Alankar : आलिशान जगणं सोडून संन्यास घेतला आहे. यानंतर आता नुपूरने आयुष्यात पहिल्यांदाच भिक्षा मागितली आहे

टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारने (Nupur Alankar) ग्लॅमरने भरलेल्या टीव्ही इंडस्ट्रीला कायमचं बाय बाय केलं आहे. अभिनय जगतापासून दूर राहून नुपूर देवाच्या भक्तीत तल्लीन झाली आहे. आलिशान जगणं सोडून संन्यास घेतला आहे. यानंतर आता नुपूरने आयुष्यात पहिल्यांदाच भिक्षा मागितली आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर करून हा अनुभव सांगितला आहे. व्हिडीओमध्ये ती रस्त्यावर भिक्षा मागताना दिसत आहेत. आतापर्यंत सहा जणांकडून भिक्षा मिळाल्याचं सांगितलं आहे. 

भिक्षेत लोकांनी काय दिलं, याचा फोटोसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नुपूरला एका दिवसात 11 जणांकडून भिक्षा मागायची आहे. "आज भिक्षाटनचा पहिलाच दिवस आहे. संन्यासमध्ये भिक्षाटनचा अर्थ भीक मागणे असा होतो. एका संन्यासीनेच मला सकाळचा पहिला विना साखरेचा चहा दिला. त्यानंतर मला एका व्यक्तीने 21 रुपये भिक्षा म्हणून दिले" असं पोस्टमध्ये म्हटलं आहे. कटोरा घेऊन नुपूर रस्त्यावर भिक्षा मागताना दिसत आहे.  

कृष्ण भक्तीत झाली तल्लीन

नुपूरचा एक व्हिडिओ याआधी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता ज्यामध्ये ती भगवान कृष्णाच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झालेली पाहायला मिळाली. या व्हिडिओमध्ये नुपूर इतर कृष्ण भक्तांसोबत दिसली. संसारिक मोहापासून नुपूरचं विभक्त होण्यामागे एक खास कारण आहे. असे सांगितले जाते की, लॉकडाऊनच्या काळात नुपूरची आई आजारी पडली होती. नुपूरकडे तिच्या आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते, त्यानंतर तिने लोकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. 

नुपूर जवळपास 27 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीचा भाग होती

नुपूरने असेही सांगितले आहे की तिने अध्यात्माचा मार्ग अवलंबण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेतला आहे. रिपोर्टनुसार, नुपूरने मुंबईतलं तिचं घर भाड्याने दिलं आहे. नुपूर जवळपास 27 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग होती. याशिवाय ती सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनची (CINTA) सदस्यही होती. नुपूर अलंकारने 'शक्तिमान', 'घर की लक्ष्मी बेटियां', 'दिया और बाती हम' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे, याशिवाय 'राजाजी', 'सावरिया', 'सोनाली केबल' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :टेलिव्हिजन