अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका 'अशोक मा.मा.'(Ashok Ma.Ma. Serial )ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. या मालिकेत आता भैरवी अशोक मामांची बॉस होणार आहे. भैरवी बाबा म्हणून अशोक मामांचे स्वागत देखील करणार आहे.
सत्तासंघर्ष घराबाहेरचा, पण परिणाम घरात दिसणार. भैरवीला तिच्या ऑफिसमधून पदोन्नती मिळालेली असली, तरी ही प्रोफेशनल यशोगाथा फक्त तिथेच थांबणार नाही, कारण तिच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती दुसरं-तिसरं कोणी नसून, तिचे घरचेच अशोक मामा असणार आहेत. आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडेल मामा बॉस की भैरवी? अशोक मामा हे आतापर्यंत एक समजूतदार, शांत, आणि प्रसंगी घरातल्या संघर्षातून मध्यस्थी करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून उभे राहिले आहेत. मात्र आता त्यांना भैरवीच्या हाताखाली काम करावं लागणार आहे आणि यामधून निर्माण होणारं वैचारिक वर्चस्व, अभिमान आणि परस्परसंबंध यांचं द्वद्व. हे या मालिकेतील कथेचं नवं केंद्रबिंदू ठरणार आहे.
घरातील ताणतणाव अधिकच गडद होणार आहे. घरात एकीकडे राधाचं हरवलेलं मंगळसूत्र, मुलांनी घातलेला ‘घाबरवण्याचा’ प्लान, अनिशचा वाढता राग, आणि किश्या-राधा-भैरवी यांच्यात वाढत चाललेला ताण या सगळ्या पार्श्वभूमीवर आता भैरवीचं बॉसपद अधिकच वादग्रस्त ठरू शकतं. भैरवीची प्रोफेशनल कुवत आणि आत्मविश्वास एकीकडे, तर मामांचं पारंपरिक मूल्य आणि आदरपूर्वक वागणं दुसरीकडे या दोघांत संघर्ष होणार की समन्वय? याचा थेट परिणाम घरातील इतर सदस्यांवर होणार, विशेषतः जे आधीच भैरवीच्या निर्णयांवर नाराजी व्यक्त करत आहेत. पण बॉस ही पदवी भैरवीसाठी कौटुंबिक पाठिंबा वाढवणारी ठरेल की नवा संघर्ष उभा करेल? अशोक मामा घरात जसे आदरणीय आहेत, तसंच ऑफिसातही नम्र राहतील का? आणि सर्वात महत्त्वाचं – ही नवी प्रोफेशनल समीकरणं त्यांच्या घरातील समीकरणांवर कसा परिणाम करतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी मालिका पाहावी लागेल.