Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या अंदाजातला ‘पिंजरा’ देणार.... स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 02:10 IST

पिंजरा... त्यो कुनाला चुकलाय ?अवो मानसाचं घर तरी काय असतं?त्योबी एक पिंजराच की! हे तत्त्वज्ञान आपल्या रांगड्या ...

पिंजरा... त्यो कुनाला चुकलाय ?अवो मानसाचं घर तरी काय असतं?त्योबी एक पिंजराच की! हे तत्त्वज्ञान आपल्या रांगड्या भाषेत सांगणारी तमाशातील एक नर्तकी आणि‘व्यक्ती मेली तरी चालेल; पण समाजापुढील आदर्श जिवंत राहिले पाहिजेत’ या महान तत्त्वावर श्रद्धा असलेला एक माणूस या दोघांच्या संघषार्ची हृदयस्पर्शी कथा म्हणजे...पिंजरा. आसक्ती आणि विरक्ती यांतलं द्वंद्व सुरेखरीत्या उभं करणारा पिंजरा. गेल्या ४० वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ. श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्च रोजी राज्यभरातील  सिनेमागृहांत दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देऊन स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देईल.वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार विचार करावा लागतो. या चित्रपटाच्या डिजिटलायझेशनची प्रक्रिया ही सोपी नव्हती. पुरुषोत्तम लढ्ढा आणि चंद्रसेना पाटील यांच्या पुष्पक प्रियदर्शनी फिल्म्सने व्ही. शांताराम प्रॉडक्शनकडून किरण शांताराम यांच्या सहकार्याने वितरणाचे हक्क घेऊन प्रसाद लॅबमध्ये या चित्रपटाच्या ओरिजिनल प्रिंटवर प्रक्रिया करूना तिचे २ के स्कॅनिंग करून नवी अद्ययावत प्रिंट तयार केली. हँड क्लीनिंग, अल्ट्रासॉनिक क्लीनिंग, २ के स्कॅनिंग, आॅडिओ ग्रॅबिंग, कलर ग्रेडिंग, आॅडिओ रिस्टोरेशन या नानविध तांत्रिक प्रक्रिया करून या अभिजात कलाकृतीला आधुनिकतेचा नवा साज चढवला आहे.पिंजरा चित्रपटातील ‘आली ठुमकत नार लचकत, छबीदार छबी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल, मला इश्काची इंगळी डसली, दिसला गं बाई दिसला, कशी नशिबानं थट्टा, दे रे कान्हा चोळीलुगडी’ या गीतांचं गारूड आजही तितकंच आहे. खेबूडकरांचे विलक्षण आशयपूर्ण शब्द आणि रामभाऊंच्या अस्सल मराठमोळ्या ठसक्याच्या चालींना आधुनिक पार्श्वसंगीताची किनार देत संगीतकार अविनाश-विश्वजित यांनी अद्ययावत वाद्यवृंदासह या गाण्यांना नवा मुलामा दिला आहे. संवाद, गाणी, पार्श्वसंगीत, तांत्रिक बाबी या महत्त्वपूर्ण गोष्टींचे विभाजन करीत त्यात काही बदल करण्यात आला आहे.  चित्रपटाचा मूळ मोनो आॅडियो हा आता ५.१ करण्यात आला आहे. एकंदरीतच, मूळ कलाकृतीला धक्का न लावता नव्या अंदाजातील पिंजरा पुन्हा रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे.