Join us

​नेहा कक्कर करणार लग्न?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 14:13 IST

नेहा कक्कर सध्या सारेगमप लिटल चॅम्पसमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. पण या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत असताना तिला नुकताच तिचा ...

नेहा कक्कर सध्या सारेगमप लिटल चॅम्पसमध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. पण या कार्यक्रमाचे चित्रीकरण करत असताना तिला नुकताच तिचा जीवनसाथी मिळाला आहे. या कार्यक्रमामधीलच एका व्यक्तीची तिने पती म्हणून निवड केली आहे. या कार्यक्रमाचा आगामी भाग हा शादी स्पेशल असल्याने सगळे स्पर्धक लोकप्रिय वेडिंग नंबर्स गाताना आणि त्यावर परफॉर्म करताना दिसणार आहेत. या भागासाठी खास सेटदेखील सजवला होता. फुलांची आरास करण्यात आली होती आणि सर्व स्पर्धकांनी आणि ज्युरीने पारंपरिक कपडे घातले होते. या कार्यक्रमातील स्पर्धकांपैकी सोनाक्षी कर आणि श्रेयन भट्टाचार्य यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील मेहेंदी लगाके रखना हे गाणे गायले तर जसू खान आणि सारेगमपचा माजी स्पर्धक राजा हसन यांनी दुल्हे का सेहेरा हे गाणे गात उपस्थितांचे मन जिंकले. हे परफॉर्मन्स सादर होत असतानाच नेहा कक्करला एक आश्चर्याचा धक्का मिळाला. कारण या कार्यक्रमातील दोन व्यक्तिंकडून तिला प्रपोज करण्यात आले. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि या कार्यक्रमाचा स्पर्धक जयेश कुमार या दोघांनीदेखील तिला प्रपोज केले. त्यामुळे या दोघांमधून कोणाची निवड करू असा तिला प्रश्न पडला होता. त्यावर तिने या दोघांना गायला सांगितले आणि जो चांगले गाणे गाईल त्याची मी निवड करेन असे तिने सांगितले त्यावर या दोघांनीही गाणी सादर केली. पण त्या दोघांनीही दमदार गाणी सादर त्यानंतर नेहासाठी या दोघांमध्ये एकाची निवड करणे आणखीनच कठीण झाले. त्यानंतर मग या दोघांनी कॅट वॉक करत नेहाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातूनही आपल्यासाठी योग्य जोडीदार कोण हे नेहाला कळत नव्हते. मग शेवटी एका ताटात अंगठी लपवली गेली आणि ही अंगठी ज्याला मिळेल त्याच्याशी नेहा लग्न करेल असे ठरले. त्यामुळे आता नेहा कोणाशी लग्न करते हे तुम्हाला लवकरच कळेल.