Vallari Viraj: 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlarla) ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतून वल्लरी विराज हे नाव महाराष्टातील घराघरात पोहोचलं. वल्लरीने या मालिकेत लीला ही प्रमुख भूमिका साकारली असून तिने या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. दरम्यान, वल्लरी विराज आणि राकेश बापट यांच्यासह मालिकेत भारती पाटील, भूमिजा पाटीस, शर्मिला शिंदे तसंच प्रसाद लिमये अशी तगडी स्टारकास्ट आहे. मात्र, लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यात आता वल्लरी विराजने दिलेल्या एका मुलाखतीत मालिकेविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.
नुकतीच वल्लरी विराजने 'टेली गप्पा' या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेविषयी प्रश्न विचारण्यात आला. याविषयी बोलताना म्हणाली,"मला नशीबाने सगळ्याच प्रोजेक्ट्समध्ये टीम चांगलीच मिळाली. अॅमेझॉनची वेब सीरिज असो किंवा माझी कन्नीची टीम सुद्धा छान होती. पण, नवरी मिळे हिटलरलाची टीम तर आम्ही कुटुंबासारखेच आहोत. म्हणजे आता मालिका संपतेय याचं वाईट वाटतंय पण जास्त वाईट याचं वाटतंय की या लोकांना मी परत भेटणार नाही. म्हणजे अगदीच आमच्या स्पॉट दादा ते मेकअप आर्टिस्टपासून सगळेच आम्ही एकमेकांशी जोडलेलो आहोत."
त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "लीलाचं असं झालंय की, मी एक सव्वा वर्ष मी हे पात्र साकारते आहे. बाकी सगळे दीड-दोन महिने काम केलंय. त्यात आता मालिका संपते आहे.पण, तो बॉण्ड तसाच आहे. शिवाय ही मालिका केल्यामुळे इथला अनुभव खूपच वेगळा आहे. नवरी मिळे हिटलरला मालिका करुन प्रेक्षकांकडून जे प्रेम मिळालंय त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.