चाहूल २ मालिकेमध्ये सर्जाचा चेहराच उलघडणार वाड्यातील रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2017 16:17 IST
चाहूल २ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत ...
चाहूल २ मालिकेमध्ये सर्जाचा चेहराच उलघडणार वाड्यातील रहस्य
चाहूल २ मालिकेमध्ये खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळालेले नाही. तसेच सर्जाला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही. या सगळ्यामध्ये वाड्यात अजून एक विचित्र गोष्ट घडली आहे, ती म्हणजे सर्जा सारख्याच दिसणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध आहे हे सर्जाच्या लक्षात आले आहे. या व्यक्तीचे नाव साहेबराव असे आहे. साहेबराव हा सुरेखाचा नवरा असून तो वाड्यामधून गायब आहे. सर्जाचा रोल साकारत असलेला अक्षर कोठारी या साहेबरावच्या लुकमध्ये अगदीच वेगळा दिसणार आहे. या लूकमध्ये अक्षर पगडी, जॅकेट, कुर्ता, धोतर आणि कपाळावर लाल टिळा अशा रंगभूषेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चाहूल २ या मालिकेमधील अक्षरचा हा नवा लूक प्रेक्षकांना आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. या मालिकेला लवकरच अनेक वळण मिळणार असून अनेक निरुत्तरीत प्रश्नांची उत्तरं मालिकेत प्रेक्षकांना मिळणार आहेत. आता पुढील भागांमध्ये सर्जाला वाड्यातील एका पेटीमध्ये साहेबरावचा फोटो मिळणार आहे आणि तो फोटो पाहून त्याला प्रश्न पडणार आहे की, हा माणूस हुबेहूब माझ्यासारखाच कसा काय दिसतो? आणि हा माणूस आहे तरी कोण? सर्जाला भायजोच्या बोलण्यातून सुगावा लागणार आहे की, हा साहेबराव सुरेखाचा नवरा आहे. साहेबराव वाड्यामध्ये का राहत नाही? सुरेखा काय लपवत आहे? हे शोधण्याचा तो निर्धार करणार आहे. वाड्यामध्ये राणी म्हणजेच खऱ्या शांभवीला देखील साहेबरावबद्दल कळणार आहे आणि त्याच्या बद्दलची माहिती मिळत असताना असे देखील कळणार आहे की, त्याने सुरेखा ही त्याची पत्नी असताना देखील दुसऱ्या बाईला घरात आणले होते. या बाईला त्याने का घरात आणले? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र अगदी सारखे आहेत. Also Read : चाहुलच्या सेटवर अक्षर कोठारीच्या वाढदिवसाचे दमदार सेलिब्रेशन