Join us

अरुंधतीच्या चारित्र्यावर कुटुंबीयांनीच घेतला संशय? आशुतोषच्या येण्यामुळे देशमुख कुटुंबात वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 16:30 IST

Aai kuthe kay karte updates:एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अरुंधती आणि आशुतोष यांची वरचेवर भेट होत असून आता त्यांच्या या भेटीगाठी देशमुख कुटुंबियांना खटकू लागल्या आहेत.

'आई कुठे काय करते' ( Aai kuthe kay karte) या मालिकेत नुकत्याच एका नव्या कलाकाराची एन्ट्री झाली आहे. अनिरुद्धपासून विभक्त झाल्यानंतर अरुंधतीच्या आयुष्यात तिचा कॉलेजचा जुना मित्र आशुतोष केळकर आला आहे.त्यामुळे या मालिकेला रंजक वळण मिळाल आहे. विशेष म्हणजे एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अरुंधती आणि आशुतोष यांची वरचेवर भेट होत असून आता त्यांच्या या भेटीगाठी देशमुख कुटुंबियांना खटकू लागल्या आहेत.

स्टार प्रवाहने अलिकडेच त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये देशमुख कुटुंबातील सदस्य अरुंधतीसोबत वाद घालताना दिसत आहे. तसंच आशुतोषचं वारंवार घरी येणं कोणालाही पटत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

"आशुतोषचं सारखंसारखं घरी येणं बरं वाटत नाही", असं आई अरुंधतीला सांगतात. त्यावर "ज्यावेळी संजना, अनिरुद्धची मैत्रीण म्हणून घरी येत राहिली त्यावेळी असे प्रश्न तुम्ही त्यांना नाही विचारले. मग मलाच का असं विचारता?", असा जाब अरुंधतीने विचारला. त्यावर "आईचा मित्र असूच शकत नाही", असं अभि म्हणतो.

दरम्यान, घरातल्यांनी थेट चारित्र्यावर बोट उचलल्यानंतर अरुंधतीचा संयम सुटतो आणि ती थेट उत्तर देते. "बास्स...माझ्या चारित्र्याविषयी असं घाणेरडं बोललेलं मी ऐकून घेणार नाही", असं अरुंधती म्हणते. आता तिच्या या वक्तव्यानंतर पुढे काय होणार? घरात नवीन वादळ उभं राहणार का? की अरुंधती कोणता तरी नवा निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार