Join us

"मालिका बंद होणार याचं दुःख आहेच, पण...", 'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 12:17 IST

गेल्या वर्षभरामध्ये छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या.

Navri Mile Hitlarla: गेल्या वर्षभरामध्ये छोट्या पडद्यावर बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातील काही मालिका चाहत्यांच्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा बाग बनल्या. परंतु, टीआरपीच्या शर्यतीत न टिकल्याने काही लोकप्रिय मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यात आता झी मराठी वाहिनीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका  लवकरच बंद होणार आहे. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग शूट करण्यात आला. त्यामुळे मालिका रसिक देखील नाराज आहेत. याचनिमित्ताने मालिकेत एजेंची मोठ्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शर्मिला शिंदेने एका मुलाखतीत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अलिकडेच शर्मिला शिंदेने मराठी मनोरंजन विश्व' यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेबद्दल भरभरुन बोलली आहे. त्यावेळी शर्मिला म्हणाली , "कुठलीही मालिका सुरु झाल्यानंतर एक दिवस संपते. त्यात काही वादच नाही. पण,जितकी अपेक्षा केली होती की, या स्टोरीमध्ये खूप स्कोप होता. मला तरी असं वाटलं होतं की ३-४ वर्ष तरी ही मालिका सुरु राहिल. तेवढा तो टप्पा पूर्ण न करता जेव्हा एखादी मालिका थोडी लवकर संपते. तेव्हा दु: ख या गोष्टीचं होतं की आपण वर्षभर एका पात्रासाठी मेहनत घेतो. खरंतर ते पात्रांमध्ये रुळायला खूप वेळ लागतो. एक-दोन दिवसात ते होतं नाही. आपण हळूहळू ते पात्र स्थिर झालं होतं. त्यात आता कुठे सगळी पात्रं स्थिरावली होतं आणि प्रत्येकाला त्याचं उदिष्ट सापडलं होतं, आता मला काय करायचं? हे प्रत्येकाला समजलं होतं आणि त्यात मालिका बंद होते. त्यामुळे या गोष्टी पुन्हा नाही करता येणार. एक पात्र निवडल्यानंतर जेव्हा आपण तीन-चार वर्ष ती भूमिका साकारतो. तेव्हा असं वाटतं की आता मी त्या पात्राला न्याय दिला. ती मालिका जरी संपली त्या पात्राचं आयुष्य मी जगले असं वाटतं. तसं न होता मालिका लवकर संपतेय. हळूहळू सगळ्यांमधील केमिस्ट्री निर्माण झाली होती." 

त्यानंतर अभिनेत्री म्हणाली, "त्यामुळे दु: ख या गोष्टीचं आहे की आता हे पात्र पुन्हा जगता येणार नाही. माझ्या यापूर्वींच्या मालिकां ४-५ वर्ष चालल्या आहेत. त्या पात्रांबद्दल मी आनंदी आहे. त्या भूमिका मी जगले. पण, आता इथे तसं होत नाही. कारण मला दूर्गा पुन्हा साकारता येणार नाही. खूप कष्टाने डायरेक्शन डिपार्टमेन्ट, रायटर्स, चॅनेल आणि कलाकार सगळे ते पात्र उभं करतो. अर्धवट राहिल्यासारख्या भावना निर्माण होतात. त्या गोष्टी मला करता येणार नाही. पण, हे कुठेतरी अर्धवट राहिल्याचं दु: ख मला होतंय. प्रेक्षकांना मला एक सांगायचं आहे. या निर्णयामुळे तुम्ही नाराज झाला आहात हे मान्य आहे. तुम्हीसुद्धा मालिकेशी भावनिकदृष्ट्या जोडले गेले आहात. पण, चॅनेल आहे ते काही चुकीचे निर्णय घेणार नाहीत. मालिकेची वेळ बदलली म्हणून टीआरपी कमी झाला, असं म्हणणं चुकीचं आहे." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी