Join us  

मन झालं बाजिंद: 'अंगवळणी पडायला कठीण जातंय'; मुंज्याने सांगितला सेटवरील अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 6:35 PM

Man jhale bajind: अलिकडेच तानाजीने एका मुलाखतीत मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा असतो हे सांगितलं आहे. 'सैराट'च्या यशानंतर तानाजी छोट्या पडद्याकडे वळला.

ठळक मुद्देसध्या छोट्या पडद्यावरील 'मन झालं बाजिंद' ही मालिका तुफान गाजत आहे.

२९ एप्रिल २०१६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'सैराट' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात गाजला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने तुफान लोकप्रियता मिळवली. या चित्रपटातील प्रत्येक गाणं आणि संवाद सुपरहिट ठरले. त्यासोबतच यातील काही कलाकार मंडळींनीही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. आर्ची, परश्या, सल्या आणि लंगड्या या भूमिका साकारणाऱ्या नवोदित कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून त्यांच्यातील अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर अरबाज शेख (सल्या) आणि तानाजी गालगुंडे (लंगड्या) ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली. सध्या हे दोघंही 'मन झालं बाजिंद' या मालिकेत झळकत आहेत.

अलिकडेच तानाजीने एका मुलाखतीत मालिकांमध्ये काम करण्याचा अनुभव कसा असतो हे सांगितलं आहे.सैराटच्या यशानंतर तानाजी छोट्या पडद्याकडे वळला. मन झालं बाजिंद या मालितकेत तो सध्या मुंज्या ही भूमिका साकारत आहे. याच भूमिकेच्या निमित्ताने त्याने त्याचा अनुभव शेअर केला आहे. 

'कॉमेडी सर्कस'च्या गंगुबाईने घटवलं २२ किलो वजन; आता दिसते प्रचंड ग्लॅमरस

"टेलिव्हिजनमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळात खूप जास्त फास्ट आहे. या माध्यमातून कमी वेळात आपण खूप मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचतो. त्यामुळे या माध्यमामध्ये काम करण्याचा वेगही जास्त आहे. खरं तर हे सगळं अंगवळणी पडायला कठीण जातंय. मात्र, मालिकेची सगळी टीम खूप पाठिंबा देते. मला सतत सांभाळून घेतात, " असं तानाजी म्हणाला. 

पुढे तो म्हणतो, " चित्रपटामध्ये स्क्रिप्ट खूप आधी मिळते. मग त्यावर चर्चा होते. पण, टेलिव्हिजनवर असं नसतं. इथे सीनच्या अवघ्या काही तास आधी स्क्रिप्ट मिळते आणि लगेच सीन करावा लागतो. "

दरम्यान, सध्या छोट्या पडद्यावरील 'मन झालं बाजिंद' ही मालिका तुफान गाजत आहे. या मालिकेत वैभव चव्हाण आणि श्वेता राजन मुख्य भूमिकेत झळकले आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकाररिंकू राजगुरूसिनेमा