Join us  

‘खुलता कळी खुलेना’ मालिकेला 5 वर्ष पूर्ण, जुन्या आठवणीत रमली मयुरी देशमुख 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 1:18 PM

‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका आणि या मालिकेतील मानसी, मोनिका आणि विक्रांत या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. आज या मालिकेला 5 वर्ष पूर्ण झालीत.

ठळक मुद्देसिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे.

मराठी मालिका हा मराठी गृहिणींचा जीवाभावाचा विषय. काही मालिका विसरण्याजोग्या नसतात. अनेक वर्षानंतरही या मालिका चाहत्यांच्या आठवणीत राहतात. अशीच एक मालिका म्हणजे, ‘खुलता कळी खुलेना’. ही मालिका आणि या मालिकेतील मानसी, मोनिका आणि विक्रांत या व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाल्या होत्या. आज या मालिकेला 5 वर्ष पूर्ण झालीत. अशात मानसीची भूमिका साकारणा-या मयुरी देशमुखने ( Mayuri Deshmukh) एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.  ‘खुलता कळी खुलेना’ सेटवरचा एक जुना व्हिडीओ मयुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे व मयुरी तिघेही धम्माल मस्ती मूडमध्ये दिसत आहेत. ‘खुलता कळी खुलेना... काही नात्यांना नावं नसतं..., असे हा व्हिडीओ शेअर करताना मयुरीने लिहिले आहे.

या मालिकेमध्ये अभिनेत्री मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे आणि ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका होत्या. यामध्ये मानसी आणि ओमने एका डॉक्टरची भूमिका साकारली होती. या मालिकेचे शीर्षकगीतसुद्धा अतिशय लोकप्रिय झाले होते. हे गीत प्रसिध्द गायिका श्रेया घोषालने गायले होते. ‘मी पाहावे तू दिसावे’ असे या गीताचे बोल होते. 

सिनेमा, नाटक आणि मालिका या विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर मयुरीने रसिकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. आजोबा आणि नात यांच्या गोंडस तरीही संवेदनशील भावविश्वावर भाष्य करणारे नाटक म्हणजे ‘डिअर आजो’ हे मयुरीचे नाटक खूपच गाजले होते. या नाटकाच्या लेखनाची धुराही मयुरीने सांभाळली होती. तसेच ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत तिने साकारलेली मानसीची भूमिका ही खूपच गाजली होती. तसेच मयुरीचा ‘लग्नकल्लोळ’ सिनेमा प्रदर्शित झाला. यात मयुरीसह सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :मयुरी देशमुख