Join us  

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मराठी अभिनेत्रीला आकारला गेला तिपट्ट टोल, नितीन गडकरींना टॅग करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 1:05 PM

ऋजुता देशमुखने मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर आलेला टोलचा अनुभव शेअर केला आहे.

ऋजुता देशमुख ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक मराठी मालिका व चित्रपटांत काम करुन ऋजुताने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ऋजुता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबद्दल ती सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती देत असते. सध्या ऋतुजाने शेअर केलेल्या एका व्हिडिओने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. ऋजुताने मुंबई ते पुणे प्रवासादरम्यान आकारल्या जाणाऱ्या टोलबाबत आलेला अनुभव व्हिडिओतून शेअर केला आहे. 

ऋजुताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आलेला अनुभव शेअर केला आहे. ऋजुता म्हणाली, "माझं माहेर पुण्याचं आहे. पण मुंबईत येऊन आता मला जवळपास २५ वर्ष झाली आहेत. पण, माझे आई-वडील आणि सासू-सासरे पुण्यात असल्यामुळे माझं बऱ्याचदा पुण्याला जाणं होत असतं. प्रत्येकवेळी मी गाडी घेऊन जात नाही. पण जेव्हा मी गाडी घेऊन जाते किंवा कुटुंब सोबत असतं, तेव्हा आम्ही लोणावळ्यात थांबतो. ३१ जुलैला आम्ही गाडी घेऊन पुण्याला गेलो होतो. तेव्हा लोणावळ्यात मिसळ खाण्यासाठी थांबलो होतो. त्यानंतर आम्ही पुण्याला गेलो. टोलवर मेसेज किंवा मेल उशीरा येतात." 

"खालापूर २४० आणि तळेगावला ८० रु टोल आकारला जातो. जेव्हा आम्ही पुण्याला घरी जातो तेव्हा माझ्या नवऱ्याला २४० आणि २४० असे दोनदा  टोल आकारल्याचा मेसेज आला. त्याने मला दाखवल्यानंतर मीदेखील मेल चेक केला. मलाही सेमच मेल आला होता. त्यांनतर मी मेलद्वारे तक्रार नोंदवत आवश्यक कागदपत्रेही दिली. त्यानंतर त्या मेलवर कोणताही रिप्लाय आला नाही. पण दुसऱ्या दिवशी १ ऑगस्टला मी मुंबईला गेले तेव्हा टोलपाशी गाडी लावली आणि मला मॅनेजरशी बोलायचं आहे, असं सांगितलं. त्यानंतर मॅनेजर आले आणि मी त्यांच्याशी बोलले. त्यांनी मला लोणावळ्यात थांबला होतात का? असा प्रश्न विचारला. हो, पण आम्ही नेहमी लोणावळ्यात उतरतो आणि एक्सप्रेसवेवर येतो, असं मी त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी मला आता दोन टप्पे केले आहेत...मुंबई ते लोणावळा २४० आणि लोणावळा ते पुणे २४० अशा दोन भागांत टोल आकारला जातो, असं ते मला म्हणाले," असं ऋजुताने सांगितलं आहे. 

क्रांती रेडकर नाही तर समीर वानखेडेंना आवडते 'ही' मराठमोळी अभिनेत्री, खुलासा करत म्हणाले...

पुढे ती म्हणाली, "फास्टटॅग सुरू झाल्यापासून असे टोल आकारले जात असल्याचं त्यांनी मला सांगितलं. फास्टटॅग सुरू होऊन आता दोन वर्ष झाली आहेत आणि त्यानंतरही मी अनेकदा पुण्याला गेलेले आहे. तेव्हा २४० आणि ८० असाच टोल आकारला गेला आहे. मी मेलही दाखवू शकते. यावेळीच २४० आणि २४० असा टोल का आकारला गेला?  असं मी त्यांना म्हणाले. यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. आता दोन टप्पे झाले आहेत आणि हे नियमात बसत नाही, असं त्यांनी सांगितलं. मुंबई ते लोणावळा हे अंतर ८३ किमी आणि लोणावळा ते पुणे हे अंतर ६४ किमी अंतर आहे...जवळपास २० किमीचा फरक आहे. हा कोणता नवीन नियम आहे? असा अनुभव तुम्हालाही आलाय का? मेलवरही अजून मला काहीच रिप्लाय आलेला नाही. टोलवरही मला असं उत्तर देण्यात आलं. अंतर वेगवेगळं असताना २४० टोल आकारला जाणं बरोबर आहे का? यात काहीतरी बदल व्हावा असं मला वाटतं."

'बाईपण भारी देवा' पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरचा दीपाबरोबर व्हिडिओ कॉल, कौतुक करत म्हणाला...

ऋजुताने तिच्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्य सरकारला टॅगही केलं आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

टॅग्स :मराठी अभिनेतामुंबईपुणे