Manasi Salvi: 'दिस चार झाले मन' या गाण्याचे बोल कानावर पडताच डोळ्यासमोर अभिनेत्री मानसी साळवीचा (Manasi Salvi) चेहरा उभा राहतो. मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 'कोई अपना सा', 'पवित्र रिश्ता', 'सपने सुहाने लडकपन के', 'प्यार का दर्द है मीठा मीठा' अशा हिंदी मालिकांमध्ये तिने साकारलेल्या भूमिका विशेष गाजल्या. पण, मराठी आणि हिंदी मालिकाविश्वात नाव कमावल्यानंतर मानसी साळवीला हिंदी चित्रपटांची ऑफर मिळाली होती का? याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
नुकतीच अभिनेत्री मानसी साळवीने 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने हिंदी चित्रपटांमध्ये काम का केलं नाही याबद्दल खुलासा केला. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मला हिंदी चित्रपटांसाठी बऱ्याच ऑफर्स आल्या. पण, मी आणि माझी आई जेव्हा त्या वातावरणात जायचो तेव्हा कुठे ना कुठेतरी माझ्या आईला असं वाटलं की हे आपल्यासाठी नाही. कारण तेव्हा माझी आईच माझ्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायची. त्यामुळे टीव्ही इंडस्ट्रीत काम करण्याचा निर्णय घेतला."
पुढे अभिनेत्रीने सांगितलं, "आता सिनेसृष्टीत वातावरण खूप बदललेलं आहे. कारण तेव्हा लोकं, त्यांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तसंच त्यांची बोलण्याती पद्धत हे फार वेगळं होतं. टीव्ही इंडस्ट्रीत आपल्यासारखी माणसं होती. कौटुंबीक वातावरण होतं. बॉलिवूड हे एक वेगळंच विश्व होतं. त्यामुळे असं वाटलं की, आपण या वातावरणात आपण मॅच नाही करु शकणार. कारण बॉलिवूडमध्ये खूप स्पर्धा आहे आणि तिथे बरीच मोठी पैशांची गुंतवणूक केली जाते. जिथे चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवला जातो तर तिथे अपेक्षाचं ओझं आपल्यावर असतं. शिवाय माझं टीव्हीमध्ये काम चालू असल्यामुळे मी बॉलिवूडमध्ये काम न करण्याचा निर्णय घेतला." असा खुलासा अभिनेत्रीने केला.