"सुख म्हणजे नक्की काय असतं"या गाजलेल्या मालिकेत शालिनी या खलनायिकेच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) तिच्या सौंदर्यामुळेही ओळखली जाते. माधवी नियमित योग करते. तिच्या सौंदर्याचं, फिटनेसचं कायमच कौतुक केलं जातं. नॅचरल ब्युटी असंच तिला म्हणतात. दरम्यान सध्या सौंदर्याच्या परिमाणांमध्ये सर्जरी, फिलर्स हेही काही नवीन संकल्पना आल्या आहेत. यावर अनेकदा संमिश्र प्रतिक्रिया येतात. माधवी निमकरने याबाबतीत नुकतंच तिचं मत सांगितलं.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत माधवी निमकर म्हणाली, "बोटॉक्स, फिलर्स किंवा अजून काहीही जे आजकाल कलाकारच नाही तर सामान्य मुलीही करतात हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मला वाटतं की चेहरा किंव शरीर हे कलाकाराचं असेट आहे. विशेषत: अभिनेत्रींसाठी ते महत्वाचं आहे. अभिनय बघून आणि त्यांचा चेहरा बघून प्रेक्षकांना एखादी अभिनेत्री आवडते. पण जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की मला माझ्या सौंदर्यात अजून बदल करायचे आहेत. चेहऱ्यात काहीतरी चांगलं दिसत नाहीए म्हणून जर एखादीने सर्जरी केली तर त्यात काय चुकीचं आहे? दिसण्यासाठीच करतायेत ना. त्यांना अजून सुंदर दिसण्यासाठी, मेंटेन राहण्यासाठी करत असतील तर त्यांनी का करु नये? कलाकारांना सौंदर्य टिकवायचं आहे त्यामुळे त्यांना वाटत असेल तर त्यांनी करावं."
ती पुढे म्हणाली,"आज बोटॉक्स किंवा सर्जरी करणाऱ्या कितीतरी अभिनेत्रींना आपण आवडीने बघतो. तिने बोटॉक्स केलंय, प्लास्टिक बॉडी आहे असं म्हणून आपण त्यांना बघणं सोडून देतो का? मलाही अनेक अभिनेत्री दिसायला आवडतात. पडद्यावर चांगलं दिसणं महत्वाचं आहेच ना. मग यात काही चुकीचं मला वाटत नाही. मला स्वत:ला अजून काही सर्जरी करण्याची गरज वाटत नाही किंवा मी करेनच असं नाही. पण जे करतात त्यांच्याबद्दल मला काहीच वाटत नाही. जर एखाद्याचा आत्मविश्वास वाटत असेल तर त्यांनी ते करावं. हा फक्त ते धोकादायक नाही ना किंवा त्याचा काही दुष्परिणाम नाही ना इथपर्यंत ते ठीक आहे."