Join us

'माझा साखरपुडा...' गौरी कुलकर्णीने खरं काय ते उघड केलं, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 09:42 IST

गौरीने दोन दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टवरुन चाहते संभ्रमात पडले होते.

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) नुकतीच सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत होती. बोटातील अंगठीचा फोटो दाखवत तिने नव्या प्रवासाची हिंट दिली होती. साहजिकच आहे हा गौरीचा साखरपुडा झाला की काय असाच अंदाज सर्वांनी लावला. पण आता यामागचं खरं गुपित समोर आलंय. गौरीची पोस्ट ही अंगठीसंदर्भात नव्हतीच तर ती 'नेल आर्ट' वरुन होती. 

गौरीने दोन दिवसांपूर्वी केलेल्या पोस्टवरुन चाहते संभ्रमात पडले होते. तिचा साखरपुडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. तसंच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र आता गौरीने साखरपुडा झाला नसल्याचा खुलासा केला आहे. तिने नेल आर्टचा नवीन व्यवसाय सुरु केला असून त्यासंदर्भातच ती प्रमोशनल पोस्ट केल्याचं उघड झालं आहे. गौरीला नेल आर्टची आवड असून तिने 'नखरेल नेल्स' हा ब्रँड सुरु केलाय. याचा लोगोही तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसंच व्हिडिओ शेअर करत गौरी म्हणाली,'माझ्या मागच्या पोस्टला अपेक्षेपेक्षा जास्त भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही त्या पोस्टवरुन खूपच उत्सुक असाल तेवढीच मीही तुम्हाला सगळ्यांना त्याबद्दल सांगण्यासाठी आतुर आहे.'

ती पुढे म्हणाली, 'त्या पोस्टमध्ये तुमचं लक्ष गेलं असेल तर त्यात खरं सगळे डिटेल्स आहेत. मी कोणामध्ये गुंतलेली नसून एका गोष्टीमध्ये गुंतलेली आहे. गेल्या काही वर्षांपासूनचं माझं स्वप्न पूर्ण होतंय. मी माझा स्वत:चा ब्रँड लाँच करतेय. ब्रँडचं नाव आहे नखरेल नेल्स. हा एक प्रेस ऑन नेल्सचा ब्रँड आहे. तुम्ही याचं सोशल मीडिया पेज फॉलो कराल अशी मला आशा आहे. आतापर्यंत एक अभिनेत्री म्हणून तुम्ही मला भरुभरुन प्रेम दिलं तसंच या ब्रँडवरही प्रेम कराल अशी मला अपेक्षा आहे. तुमचे आशिर्वाद असतील अशी मी अपेक्षा करते. नखरेल नेल्स बाय गौरी' 

'मी खरंच जेव्हा engagement करेन तेव्हा तुम्हा सर्वांना नक्की सांगेन' असंही तिने गंमतीत कॅप्शनमध्ये लिहिलं. गौरीला तिच्या या नवीन बिझनेससाठी अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या गौरी 'प्रेमास रंग यावे' मालिकेत काम करत आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामराठी अभिनेतासोशल मीडिया