Join us

"काही लोक वेगळं काम करायला गेले अन् फसले", अभिनय क्षेत्रातील चढाओढीबद्दल भाऊ कदम स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 12:03 IST

"काही लोक वेगळं काम करायला गेले अन् फसले", अभिनय क्षेत्रातील स्पर्धेबद्दल भाऊ कदम स्पष्टच बोलले 

Bhau Kadam :'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवणारे भाऊ कदम (Bhau Kadam) यांची लोकप्रियता सर्वश्रूत आहे. भाऊ कदम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत 'चला हवा येऊ द्या' व्यतिरिक्त 'टाइमपास', 'पांडू' तसेच 'नशीबवान' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. चित्रपटांमधील त्यांच्या प्रत्येक भूमिकेने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या भाऊ कदम 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. याचनिमित्ताने दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रातील स्पर्धेबद्दल आपलं मत व्यक्त केलंय.

भाऊ कदम यांनी नुकतीच 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रातील स्पर्धेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. या मुलाखतीदरम्यान भाऊ कदम यांना प्रश्न विचारण्यात आला की, आपली इंडस्ट्री अशी आहे, ज्यामध्ये खूप स्पर्धा आहे. तर तुम्हाला अशी कधी भीती वाटते का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले," अशी भीती वाटत नाही. कारण, दादा कोंडके साहेबांचं उदाहरण आहे. त्यांनी ती स्टाईल केली, जी लोकांना आवडायची. तर माझं काम लोकच बघणार आहेत आणि तेच ठरवणार आहेत. लोकांचं म्हणणं हेच असतं की, आम्हाला तुम्ही वेगळं काही देऊ नका. आपण वेगळं करायला जातो आणि लोकांना ते आवडत नाही. त्यांना तेच आवडतं, जे त्यांना हवंय आणि मी ते देतो. आता काही लोकं वेगळं करायला गेले, तर त्यामध्ये ते फसले आहेत. मी इंडस्ट्रीतल्या लोकांना दाखवेन की, मला या गोष्टी येतात. पण, प्रेक्षकांना ते बघायचं नाही. लोक म्हणतील की, तू विनोदी करतोस, तर विनोदी कर. त्यामुळे जे मला येतं, तेच मी करीत राहणार आहे. वेगळं करायला गेलं तर मी कदाचित फसेन."

यानंतर पुढे ते म्हणाले, "मी केदार शिंदेंच्या एका मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम केलं होतं. ‘मधू अन् इथे चंद्र तिथे’ नावाची ती मालिका होती. त्यामध्ये मी एका आंधळ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. तर ती पाहिल्यावर मला सचिन पिळगांवकरांचा फोन आला होता. भूमिका छान केली आहेस, म्हणून त्यांनी कौतुक केलं होतं. तेव्हा मला लोक ओळखत नव्हते. पण, आता मी जर करायला गेलो, तर कदाचित लोकांना आवडणार नाही." असं मत भाऊ कदम यांनी मुलाखतीमध्ये व्यक्त केलं. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bhau Kadam speaks frankly about competition, some failed trying different roles.

Web Summary : Bhau Kadam believes sticking to one's strengths is crucial in acting. Experimenting can backfire if it doesn't resonate with the audience. He emphasizes delivering what the audience wants and recalls praise for a serious role early in his career, noting audiences' tastes have changed.
टॅग्स :भाऊ कदममराठी अभिनेतासेलिब्रिटी