Join us  

सानिकामुळे होणार दिपूचा मोठा अपघात; मरणाच्या दारातून दिपू येईल का परत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:52 AM

Man udu udu zal: सानिकासाठी देशपांडे सरांनी घरी पूजा ठेवली होती. मात्र, नेहमीप्रमाणे सानिकाने या पूजेमध्येही वाद घातला.

'मन उडू उडू झालं' या मालिकेने अगदी काही भागांमध्येच प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. त्यामुळे या मालिकेचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या या मालिकेत दिपू आणि इंद्रा यांच्या आयुष्यात अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. सानिका लग्न करुन कार्तिकच्या घरी गेल्यापासून तिच्या स्वभावातील आगाऊपणा अधिकच वाढला आहे. इतकंच नाही तर तिच्यातील हा चुकीचा अॅटिट्यूड दिपूला महागात पडणार आहे. सानिकामुळे दिपूचा मोठा अपघात होणार असून दिपू मरणाच्या दारात उभी असल्याचं सध्या या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सानिकाला समजवायला गेलेल्या दिपूला सानिका हात धरुन घराबाहेर काढते. इतकंच नाही तर तिने दिपूला धक्का दिल्यामुळे एक भरधाव डेम्पोची धडक तिला बसते आणि जमिनीवर कोसळते. त्यामुळे आता दिपू मरणाच्या दारात उभी आहे.

सानिकासाठी देशपांडे सरांनी घरी पूजा ठेवली होती. मात्र, नेहमीप्रमाणे सानिकाने या पूजेमध्येही वाद घातला. सानिका गरोदर नसल्याचं सत्य घरात सगळ्यांसमोर येतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण होतो. इतकंच नाही तर रागारागामध्ये पूजा अर्ध्यावर सोडून सानिका निघून गेली. सोबतच 'माझे तुमच्यासोबत काहीही संबंध नाही', जातांना मालतीला सांगून जाते. त्यामुळे देशपांडे सर व मालती दुखावतात. म्हणूनच, सानिकाची समजूत काढण्यासाठी दिपू सानिकाच्या घरी जाते. मात्र, सानिका तिचं काहीही ऐकायच्या मनस्थितीत नसते. परिणामी, सानिका दिपूचा हात धरून तिला घराबाहेर काढते.

दरम्यान, सानिकाने रागात दिपूला घराबाहेर ढकलल्यामुळे दिपूचा पाय एका दगडावर पडतो आणि रस्त्यावरुन येणाऱ्या एका चालत्या डेम्पोसमोर ती जाऊन पडते. या डेम्पोचा धक्का लागल्यामुळे दिपू जबर जखमी होते आणि रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत रस्त्यावर पडते. त्यामुळे आता दिपू या अपघातातून बरी होईल का? सानिकाला तिची चूक समजेल का? देशपांडे सर आणि इंद्राला ही परिस्थिती समजल्यावर काय होईल? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारऋता दूर्गुळे