Join us  

टेंशनवरची मात्रा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नव्या रंगात १४ ऑगस्टपासून पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 12:59 PM

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाला तब्बल पाच वर्षं पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्रेच्या विनोदावीरांचा चमू सज्ज झाला आहे.

प्रत्येक मराठी रसिकाच्या आयुष्यात हास्याचे क्षण पेरण्याचे काम ज्या कार्यक्रमाने केले तो कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'! 'महाराष्ट्राच्या टेंशनवरची मात्रा म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा', असे म्हणत या विनोदी कार्यक्रमाने समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केले. विशेष म्हणजे सोनी मराठी वाहिनी आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या दोघांची सुरुवात एकाच दिवशी झाली आहे. सोनी मराठीवरील या तुफान लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात आपला मोठा प्रेक्षक वर्ग निर्माण केला आहे. कोविड काळात तर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या टेंशन वरची मात्रा ठरली. त्या वेळी सगळीकडे निराशेचे काळे ढग दाटले असताना 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा रसिकांच्या मनात आनंदाची किनार घेऊन येत होता. महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा अन् कुटुंबासोबत बसून पाहण्याचा फॅमिली शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. पोट धरून आणि पोट भरून हसवण्यासाठी तुमचे लाडके विनोदवीर  ‘महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत’ तुमचं सहकुटुंब स्वागत करायला तयार आहेत!

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाला तब्बल पाच वर्षं पूर्ण झाली आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला हास्यजत्रेच्या विनोदावीरांचा चमू सज्ज झाला आहे. अन् तोदेखील कॉमेडीचा फॅमिली पॅक घेऊन. दिवसभरातील संपूर्ण टेंशन विसरून रात्री प्रत्येक कुटुंबाला एकत्र बसून आनंदाचे क्षण मिळवून देण्यासाठी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येते आहे. मग आता कुटुंबासोबत खळखळून हसायला तयार व्हा, कारण पुन्हा येतेय तुमची लाडकी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या! १४ ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर.

कॉमेडीचा बाज, अचूक टायमिंग आणि वन टेकमध्ये विनोदवीरांनी साकारलेल्या हास्याच्या या जादूला प्रेक्षकांनी यापूर्वीच डोक्यावर घेतले आहे. यातील फिल्टर पाड्याचा बच्चन असो किंवा कोळी वाड्याची रेखा, लॉली असो किंवा शंकऱ्या-शितलीची लव्ह स्टोरी. यातल्या सगळ्याच व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्या आहेत. अभिनेता गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले , दत्तू मोरे, अभिनेत्री वनिता खरात, नम्रता संभेराव आदी कलाकारांना या हास्यजत्रेने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. याचे सगळे श्रेय जाते ते 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे लेखक, दिग्दर्शक, निर्माते असलेल्या सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना. त्यांच्या बहारदार लेखणीतून उतरलेले विनोद आणि मार्मिक भाष्य यांनी नेहमीच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दर दिवशी नव्या जोमाने केलेले भन्नाट विनोदी स्कीट, सद्यस्थितीवर केलेले तिरकस भाष्य आणि परीक्षकांपासून निर्मात्यांपर्यंत सर्वांवर केलेले विनोद हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. याशिवाय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे खुमासदार सूत्रसंचालन, अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचे परीक्षण या सर्व गोष्टी प्रेक्षकांना भावणाऱ्या आहेत.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा