मधुगंधा कुलकर्णी हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय नाव आहे. अनेक मालिका, सिनेमा, नाटकांमध्ये तिने काम केलं आहे. अभिनेत्री असण्यासोबतच मधुगंधा एक उत्तम लेखिकाही आहे. आता मधुगंधा टीव्हीवर कमबॅक करत आहे. झी मराठीच्या मालिकेतून मधुगंधा कुलकर्णी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये ती वकिलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याचा प्रोमो व्हिडीओ समोर आला आहे.
काही दिवसांपूर्वी मधुगंधाचा वकिलाच्या भूमिकेतील लूक समोर आला होता. याशिवाय एक प्रोमोही शेअर करण्यात आला होता. या प्रोमोमध्ये ती कोर्टात वकिलाच्या भूमिकेत दिसत होती. "मी कधीच कुठली केस हरत नाही. माझ्यासोबत कधीच कोणी जिंकत नाही. आताही मीच जिंकणार. तुमच्या लाडक्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार", असं या प्रोमोमध्ये ती म्हणत होती. पण, नेमकी कोणत्या मालिकेत ती दिसणार याबाबत सांगितलं नव्हतं. आता त्याचा उलगडा झाला आहे.
मधुगंधा कुलकर्णी ही 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती वकील कालिंदी धर्माधिकारी ही भूमिका साकारणार आहे. 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. शत्रू सूर्याला पोलिसांना अटक करायला लावतो. सूर्याच्या वकिलाची भूमिका मधुगंधा साकारणार आहे.
दरम्यान, मधुगंधाने 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेत काम केलं होतं. 'नाच गं घुमा', 'वाळवी', 'चि व चिसौका', 'आत्मपॅम्फ्लेट' या सिनेमांमध्येही ती दिसली होती. मधुगंधा एक निर्मातीदेखील आहे. 'एलिझाबेथ एकादशी', 'नाच गं घुमा', 'मु. पोस्ट बोंबिलवाडी' यांसारख्या सिनेमांची तिने निर्मिती केली आहे.