Join us

लंबी रेस का घोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 18:08 IST

छोटा पडद्यावरचे कलाकारांचे करियर हे काहीच वर्षांपुरता मर्यादित असते असे मानले जाते. छोट्या पडद्यावरील कलाकार हे ते साकारत असलेल्या ...

छोटा पडद्यावरचे कलाकारांचे करियर हे काहीच वर्षांपुरता मर्यादित असते असे मानले जाते. छोट्या पडद्यावरील कलाकार हे ते साकारत असलेल्या व्यक्तिरेखांमुळे प्रसिद्ध होतात. प्रेक्षक त्या कलाकारांच्या नव्हे तर त्या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडलेले असतात. त्यामुळे मालिका संपल्यानंतर काही वर्षांनी प्रेक्षक व्यक्तिरेखा आणि ते साकारत असलेले कलाकार या दोघांनाही विसरून जातात. तसेच मालिकांमध्ये रोज नेहमीच नवनवीन चेहरे पाहायला मिळत असतात. या सगळ्यामुळे छोट्या पडद्यावर तग धरून राहाणे हे कठीण मानले जाते. असे असूनही छोट्या पडद्यावर अनेक वर्षं राज्य करणारे अनेक कलाकार आहेत. अशा कलाकारांवर एक नजर टाकूया... * महेश ठाकूर ः महेशने सैलाब या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच्या कारकिर्दीला जवळजवळ १७ वर्षं पूर्ण झाले आहेत. या दरम्यान महेशने स्पर्श, थोडा है थोडे की जरुरत है, शरारत, तू तू मैं मैं यांसारख्या अनेक हिट मालिकांमध्ये काम केले आहे. आजही तो छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. सध्या इश्कबाज या मालिकेत तो नकारात्मक भूमिका साकारताना अापल्याला दिसत आहे. * अली अजगर ः अली अजगरने १९८७ साली एक दो तीन चार या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने इतिहास, दिल विल प्यार व्यारसारख्या मालिकांमध्ये काम केले. कहानी घर घर घर की या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. त्याने आतापर्यंत गंभीर, कॉमिक अशा सगळ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. कॉमेडी नाईट विथ कपिल या कार्यक्रमात आणि द कपिल शर्मा शोमध्ये अली साकारत असलेली नानी ही व्यक्तिरेखा तर प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे.* रेणूका शहाणे ः रेणुकाने सुरभी, सर्कस, इम्तिहान, सैलाब यांसारख्या अनेक मालिकांमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. आज इतक्या वर्षांनीदेखील तिच्या या मालिकांमधील भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. लग्नानंतर रेणुकाने मालिकांमध्ये काम करणे कमी केले असले तरी ती वर्षांतून एखादी तरी मालिका करते. काही महिन्यांपूर्वी ती कभी ऐसे गीत गाया करो या मालिकेत झळकली होती. तसेच सध्या ती कॉमेडीची बुलेट ट्रेन या मराठी मालिकेत परीक्षकाची भूमिका साकारत आहे.    * सुमीत राघवन ः सुमित १९८३ला आलेल्या फास्टर फेणे या मालिकेत सगळ्यात पहिल्यांदा झळकला होता. या मालिकेत त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. या पहिल्याच मालिकेतील सुमितची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यानंतर त्याने महाभारत, तू तू मैं मैं, हद कर दी, यांसारख्या मालिकेत काम केले. साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेत त्याने साकारलेली साहिल साराभाई ही व्यक्तिरेखा खूपच गाजली होती. सध्या सुमीत बडी दूर से आए है या मालिकेत काम करत आहे. * पल्लवी जोशी ः मिस्टर योगी, भारत एक खोज, मृगनयनी, आरोहण, जुस्तजू, अल्पविराम यांसारख्या अनेक मालिकेत पल्लवी जोशीने काम केले होते. तसेच अंताक्षरी, मराठी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रमात तिने सूत्रसंचालनाची भूमिका साकारलेली आहे. तिच्या छोट्या पडद्यावरील कारकिर्दीला २० वर्षांहून अधिक वर्षं झाले असूनही ती आजही छोट्या पडद्यावर खूप चांगल्या भूमिका साकारत आहे. सध्या ती मेरे आवाज ही पहचान है या मालिकेत काम करत आहे.