Join us
Daily Top 2Weekly Top 5

लागीरं झालं जी या मालिकेमुळे माझे आयुष्यच बदलले असे सांगतोय निखिल चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 13:24 IST

छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक ...

छोट्या पडद्यावर सध्या लागीरं झालं जी ही मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. मालिकेचे दिवसेंदिवस रंजक होत चाललेले कथानक आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे अल्पावधीत मालिका लोकप्रिय ठरली आहे. फौजींच्या जीवनावरील आधारित या मालिकेत अज्या म्हणजेच अजिंक्य आणि शीतली अर्थात शीतलची लव्हस्टोरीही रसिकांना पाहायला मिळत आहे. मालिकेत आता अज्या आणि शीतलीची प्रेमकथा फुलू लागलीय.
महाराष्ट्रात वेगवेगळ्या संस्कृती आपण पाहतो त्याच प्रमाणे लष्करीसंस्कृती सुद्धा आपल्या महाराष्ट्रात आहे. सैन्यात भरती होणारे अनेक जवान हे महाराष्ट्राच्या मातीतले असतात. लागीर झालं जी या मालिकेतील विक्रम फौजी म्हणजेच विक्या प्रेक्षकांचे चांगलेच मन जिंकत आहे. विक्रम म्हणजेच निखिल चव्हाण लागीर झालं जी सुप्रसिद्ध मालिकेत सैन्यात नुकत्याच भरती झालेल्या फौजीची भूमिका साकारत आहे. या मालिकेपूर्वी त्याचे आयुष्य एका साधारण तरुणासारखेच होते. या मालिकेने त्याचे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. या मालिकेत काम करण्याआधी त्याच्या मनात देशभक्तीची भावना ही होती. पण या मालिकेत काम केल्यानंतर निखिलच्या मनात फौजींबद्दलचा आदर आणि प्रेम प्रचंड वाढले आहे. या मालिकेत "फौजी"ची भूमिका साकारताना त्याला एक वेगळा आनंद मिळत असल्याचे तो सांगतो. 
लहानपणी झेंडावंदनसाठी सर्वात प्रथम उभा राहणाऱ्या निखिलला आपल्याला कधी फौजीचा पोशाख परिधान करण्याची संधीही मिळेल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. प्रत्येक भारतीयांसाठी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन राष्ट्रीय सण आहेत आणि आपणही कधीतरी या सैनिकी परेड मध्ये सहभागी होऊन भारताचे नेतृत्व करावे ही निखिलची बालपणापासूनची इच्छा होती. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा आजही जशीच्या तशी पाठ आहे, या मालिकेमुळे मला एका कर्तृत्ववान फौजीची भूमिका साकारायची संधी मिळाली. मी लागीरं झालं जी या मालिकेत फौजीची भूमिका साकारत आहे याचा मला सार्थ अभिमान आहे असे निखिल आपल्या भूमिकेबद्दल सांगतो.

Also Read : लागीरं झालं जी या मालिकेतील जयश्री म्हणजेच किरण ढाने खऱ्या आयुष्यात आहे एकदम ग्लॅमरस