Join us  

"देशद्रोहाचा आरोप असलेली व्यक्ती विधानसभेच्या पायऱ्या कशी चढते?", मराठी अभिनेत्याचा थेट प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 11:14 AM

"तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेली व्यक्ती सत्ताधारी बाकावर बसणे हे कितपत योग्य आहे?" , 'लागिर झालं जी' फेम अभिनेत्याने केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक

'लागिर झालं जी' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता निखिल चव्हाण सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. निखिल नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत पोस्टद्वारे चाहत्यांना अपडेट देत असतो. सध्या त्याच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. निखिलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्याने पहिल्यांदाच महाराष्ट्रातील राजकारणाबाबत भाष्य केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या हिवाळी अधिवेशनातील उपस्थितीवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. फडणवीसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नाराजी व्यक्त केली होती. "नवाब मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे," असे फडणवीसांनी पत्रात स्पष्ट केलं होतं. यावरुन निखिल चव्हाणने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत व्हिडिओ शेअर केला आहे. 

निखिल चव्हाणने व्हिडिओत काय म्हटलं? 

आपल्या महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना धडाडीचं पत्र लिहिलं आहे. या पत्रात ते असं म्हणतात की सत्ता येते आणि जाते, पण देश महत्त्वाचा. तर विषय असा आहे की ज्या व्यक्तीवर थेट देशद्रोहाचे आरोप आहेत आणि जी व्यक्ती तुरुंगातून जामिनावर बाहेर आली आहे...ती व्यक्ती विधानसभेच्या पायऱ्या चढू कशी शकते? हा सामान्य जनतेच्या मनात पडलेला प्रश्न आहे. बरं, त्यावर देवेंद्रजी असं म्हणतात की विधानसभा सदस्या म्हणून त्या माणसाने विधानसभेच्या कामकाजात लक्ष घालावं देखील...परंतु, महायुती सरकारमध्ये पुन्हा त्याच थाटामाटाने सत्ताधीश या नात्याने सरकारी व्यक्ती म्हणून बसणे हे कितपत योग्य आहे? अहो, हे सामान्य जनतेलाही पटणार नाही. जिथे मुरलेले राजकारणी आपली सत्ता कशी टिकावी, याचा विचार करतात. तिथे देवेंद्रजी साहेब सत्ता येते आणि जाते पण, देश महत्त्वाचा आहे, असा विचार करतात. देवेंद्रजी साहेब तुम्ही हे पत्र लिहून आमच्या सगळ्यांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा..

देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं होतं? 

माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधिमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. विधानसभा सदस्य म्हणून त्यांचा तो अधिकार सुद्धा आहे. त्यांच्याबाबत आमची वैयक्तिक शत्रुता अथवा आकस अजिबात नाही, हे मी प्रारंभीच स्पष्ट करतो. परंतु, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. सत्ता येते आणि जाते. पण सत्तेपेक्षा देश महत्वाचा आहे. सध्या ते केवळ वैद्यकीय आधारावर जामीन मिळाल्याने बाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण त्यांचे जरूर स्वागत करावे, मात्र अशाप्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो, त्यामुळे आमचा या गोष्टीला विरोध आहे. ना देशद्रोह्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अटक झाली तरी त्यांना मंत्रिपदावर कायम ठेवणाऱ्या तत्कालिन मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकारच्या विचारांशी आम्ही सहमती दाखवू शकणार नाही. आपण आमच्या भावनांची नोंद घ्याल, अशी मला आशा आहे.

टॅग्स :निखील चव्हाणदेवेंद्र फडणवीसनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसभाजपा