Join us  

"तेव्हा जातीचे रंग फिकट आणि होळीचे थोडे गडद होते", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 5:03 PM

"माझे पप्पा सकाळी ४ वाजता उठायचे आणि दीडशे फुगे...", कुशल बद्रिकेने शेअर केली भावुक पोस्ट

दरवर्षीप्रमाणे यंदाही होळी मोठ्या उत्साहात सगळीकडे साजरी केली जात आहे. सेलिब्रिटीही होळीचा आनंद घेत आहेत. होळीच्या रंगात अनेक सेलिब्रिटीही न्हाऊन निघाले आहेत. रंगांची उधळण करत सेलिब्रिटी होळी सेलिब्रेट करताना दिसत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेताकुशल बद्रिकेनेही कुटुंबीयांसोबत होळी खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. होळी सेलिब्रेशनचे फोटोही त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

कुशलने पत्नी आणि मुलांबरोबर होळीच्या रंगांची उधळण केली. पण, होळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत त्याने मनातील खंत व्यक्त केली आहे. या फोटोला कुशलने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कुशलने या पोस्टमधून होळीची बालपणीची आठवण सांगितली आहे. कुशल म्हणतो, "माझ्या आयुष्याची होळी गेली कित्येक वर्ष “फ्लॅट” संस्कृतीत पेटतेय. पण, माझी खरी होळी रंगली ती माझ्या बालपणी आमच्या “चाळीत”. माझे पप्पा पहाटे चारला उठायचे आणि दिड-दोनशे फुगे पाण्याने भरून ठेवायचे. मग रंग भरल्या पिचकारीची बंदूक आणि फुग्यांचे बॉम्ब घेऊन आमची वानरसेना दिसेल त्याच्यावर तुटून पडायची." 

"त्यावेळी जातीचे रंग थोडे फिकट आणि होळीचे रंग थोडे गडद होते, म्हणून कदाचित जगण्यात जे रंग उतरले त्याने अख्खं आयुष्य रंगीत करुन टाकलं. आता मुलांना फुगे भरून देताना गाठी मारून गुलाबी झालेलं “पप्पांचं बोट” आपल्याच हाताला फुटलंय असं वाटतं आणि आता होळीत आपल्याला फुगे भरून देणारं कुणी नाही ही जाणीव ठुसठुसत राहते बोटभर", असं म्हणत कुशल बद्रिकेने भावुक पोस्ट शेअर केली आहे. 

कुशल अनेकदा त्याच्या सोशल मीडियावरुन अशा पोस्ट शेअर करताना दिसतो. 'चला हवा येऊ द्या'मधून प्रसिद्धीझोतात आलेला कुशल सध्या 'मॅडनेस मचाऐंगे' या हिंदी शोमधून प्रेक्षकांना हसवत आहे. त्याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :होळी 2024कुशल बद्रिकेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार