Join us  

'कौन बनेगा करोडपती १३'मध्ये कतरिना कैफ, अक्षय कुमार आणि रोहित शेट्टीने केली धमालमस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2021 7:01 PM

कौन बनेगा करोडपती १३ च्या शुक्रवारच्या खास भागात अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी येणार आहेत.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती १३ च्या शानदार शुक्रवारच्या खास भागात येणार आहेत, अक्षय कुमार, कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी. १ नोव्हेंबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान होणार्‍या खास दिवाळी सप्ताहात या शोचा सेट दिव्यांनी उजळून निघणार आहे आणि रांगोळ्यांनी सुशोभित होणार आहे. बिग बी सगळ्या पाहुण्यांच्या आणि प्रेक्षकांच्या समवेत मोठ्या उत्साहाने आणि उल्हासाने दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. शानदार शुक्रवारच्या भागात हे तिन्ही पाहुणे हॉटसीटवर विराजमान होतील आणि होस्ट अमिताभ बच्चन समवेत हा खेळ खेळताना दिसतील. त्यांच्यातील गप्पा-टप्पा पाहून प्रेक्षकांना मजा येणार आहे.

 हा खेळ खेळण्याशिवाय अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी या शोमध्ये अनेक गंमती जमती करताना दिसतील. कतरिना कैफ सूर्यवंशीचा सेट साफ करतानाचा व्हिडिओ, अमिताभ बच्चन आणि कतरीना यांचा ‘टिप टिप बरसा पानी’ वरील डान्स, चित्रपटात येण्याआधीचा अक्षय कुमारचा संघर्ष आणि याराना चित्रपटातील ‘सारा जमाना’ गाण्यावरील त्याचा डान्स अशा बर्‍याच गंमतीजमती आहेत या शानदार शुक्रवारच्या भागात पहायला मिळेल. अमिताभ बच्चनसोबत हे तिन्ही पाहुणे कलाकार प्रेक्षकांना मस्ती, मनोरंजन, हास्यविनोद, आणि खेळाच्या सफरीवर घेऊन जाणार आहेत आणि कार्यक्रम रंगतदार करणार आहेत. या क्षेत्रातील कामगिरीबद्दल अमिताभ बच्चन अक्षय कुमार, रोहित शेट्टी आणि कतरिना कैफ या तिघांचे तोंड भरून कौतुक करताना दिसतील. इतकेच नाही, तर रोहित शेट्टींनी आपल्या आईसाठी लिहीलेल्या ब्लॉगवर अमिताभ बच्चन यांनी सही करावी अशी रोहित शेट्टी बिग बी यांना विनंती करताना दिसतील. तसेच अमिताभ बच्चन यांच्याशी आपल्या वडिलांच्या खास नात्याबद्दलही काही गोष्टी सांगतील. या खेळातून जिंकलेली रक्कम अक्षय कुमार, कतरिना कैफ आणि रोहित शेट्टी भारत के वीर  या सरकारी वेबसाइटला दान करतील, जी वेबसाइट देशाची सेवा करताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करते.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीकतरिना कैफअक्षय कुमारअमिताभ बच्चन