Join us
Daily Top 2Weekly Top 5

'रंग माझा वेगळा'मधील कार्तिकी उर्फ साईशा भोईरनं सोडली मालिका, समोर आले कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 10:58 IST

Rang Maza Vegla Fame Saisha Bhoir: सोशल मीडियावर लाइव्ह येऊन कार्तिकी उर्फ साईशा भोईरने रंग माझा वेगळा मालिका सोडल्याचे सांगितले.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)ने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली. त्यानंतर आता या मालिकेतील दोन चिमुरड्या म्हणजेच कार्तिकी आणि दीपिकाने देखील आपल्या निरागस अभिनयाने घराघरात पोहचल्या आहेत. कार्तिकीची भूमिका साईशा भोईर (Saisha Bhoir) तर दीपिकाची भूमिका स्पृहा दळीने साकारली आहे. दरम्यान आता मोठी बातमी समोर येत आहे. या मालिकेतील कार्तिकी म्हणजेच साईशा भोईरने मालिका सोडल्याचे समजते आहे.

साईशा भोईरला मोठ्या प्रोजेक्टची ऑफर मिळाला आहे आणि त्यासाठी ही मालिका सोडण्याचा निर्णय तिने घेतला आहे. इतकेच नाही तर मालिकेच्या टीमकडूनदेखील यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आता साईशा लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याचे बोलले जात आहे. साईशाने ही मालिका सोडल्यामुळे आता तिच्या भूमिकेत कोणती बालकलाकार पाहायला मिळणार हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये आहे. 

साईशाच्या आई वडिलांनी तिच्यासोबत इंस्टाग्रामवर लाइव्ह करून चाहत्यांना सांगितले की, रंग माझा वेगळा मालिकेत साईशा दिसणार नाही. तिच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भलेही ती मालिकेत दिसली नाही तरी ती तुमच्यासोबत सोशल मीडियावर संपर्कात राहणार आहे. साईशाला कार्तिकीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळाली आहे. आम्ही राहतो कल्याणला रंग माझा वेगळाचे शूटिंग मालाडला असायचे. त्यामुळे दररोज दोन तास जायला आणि यायला लागतात. त्यामुळे तिला शाळेत आणि अभ्यासासाठी फार वेळ मिळत नव्हता. तसेच तिच्या तब्येतीसाठीदेखील आम्ही निर्णय घेतला.  या व्हिडीओत साईशा बोलताना दिसते आहे की मला खूप कंटाळा आला होता. मला शाळेत जायचे आहे. तसेच साईशाचे आई बाबा म्हणाले की, जसे तुम्ही साईशाला कार्तिकीच्या भूमिकेत प्रेम दिले तसेच नव्या कार्तिकीलाही प्रेम द्या. साईशाच्या आई वडिलांनी पुढे सांगितले की, ती लवकरच तुम्हाला रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे. तिच्या आगामी प्रोजेक्टची माहिती आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर देत राहू.

साईशा भोईर ही चाईल्ड मॉडेल आहे. काही नामांकित ब्रँड साठी तिने रॅम्पवॉक केले आहे. साईशा आणि तिचे कुटुंब कल्याणला वास्तव्यास आहे. तिचे वडील विशांत भोईर यांना म्युजिकची आणि ट्रॅव्हलिंगची आवड आहे.साईशा युट्युब चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर नेहमी आपले व्हिडीओ अपलोड करत असते. तिच्या या वेगवेगळ्या व्हिडिओंना चाहत्यांकडून पसंती देखील मिळताना दिसते.

टॅग्स :स्टार प्रवाह