Join us

​करणवीर बोहरा करणार इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 14:32 IST

इंडियाज बेस्ट जुडवा हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना खूपच वेगळी आहे. रघू आणि राजीव ...

इंडियाज बेस्ट जुडवा हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना खूपच वेगळी आहे. रघू आणि राजीव हे दोन भाऊ एमटिव्ही रोडीज या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध झाले. रघू आणि राजीवच आता  या कार्यक्रमाची निर्मिती करणार आहेत. या कार्यक्रमात जुळ्या मुलांची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणवीर बोहरा करणार आहे. करणवीरला नुकत्याच जुळ्या मुली झाल्या आहेत. त्यामुळे करणशिवाय या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुसरे कोणी चांगल्या प्रकारे करूच शकत नाही असे या कार्यक्रमाच्या टीमचे म्हणणे होते. करण सांगतो, माझ्या मुली आयुष्यात आल्यानंतर एक सकारात्मकता माझ्या आयुष्यात आली आहे. माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. त्यांच्यामुळे माझे भाग्य बदलले आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. त्या दोघींमुळेच मला इंडियाज बेस्ट जुडवा हा कार्यक्रम मिळाला आहे असे मी म्हणेन. जुळी मुले असण्याचा फायदा म्हणजे त्यांच्यामुळे तुम्हाला झालेला आनंद द्विगुणित होतो. पण त्यांना सांभाळणे ही खरी जबाबदारी असते. कारण त्यांना भूक ही एकत्रच लागते. तसेच त्यांना एकाच वेळेला झोपायचे असते. तसेच ते एकत्रच रडतात. तसेच एकत्रच हसतात. त्यामुळे त्यांना सांभाळणे खूपच कठीण असते. त्यामुळे जुळ्या मुलांचा अनुभव काय असतो याची मला चांगलीच जाणीव आहे. मी  इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला अद्याप सुरुवात केलेली नाही. त्यामुळे या कार्यक्रमाबाबत मी काहीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही. इंडियाज बेस्ट जुडवा या कार्यक्रमात जुळी मुले असण्याचे फायदे आणि तोटे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.