Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माने दिली त्याच्या चाहत्यांना नववर्षाची ही भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:29 IST

कपिल शर्माने वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. के नाइन हे त्याचे प्रोडक्शन हाऊस लवकरच दोन ...

कपिल शर्माने वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या चाहत्यांना एक सुंदर भेट दिली आहे. के नाइन हे त्याचे प्रोडक्शन हाऊस लवकरच दोन कॉमेडी कार्यक्रमांची निर्मिती करणार आहे. कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शो या दोन्ही कार्यक्रमांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. कपिल एक खूपच चांगला कॉमेडियन असून त्याच्या कार्यक्रमात आतापर्यंत अनेक दिग्गज बॉलिवूडच्या मंडळींनी हजेरी लावली आहे. फोर्बस या मासिकांच्या यादीत पहिल्या 100 जणांमध्ये कपिलचे आतापर्यंत पाच वेळा नाव आलेले आहे. कपिलची लोकप्रियता गेल्या काही वर्षांपासून दिवसेंदिवस वाढतच आहे.कॉमेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाची निर्मिती त्याचीच होती. हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवला जात असे. पण कलर्स वाहिनी आणि कपिल शर्मा यांच्यात करार आणि मानधनावरून झालेल्या वादावरून हा कार्यक्रम कलर्स वाहिनीवर दाखवणे बंद करण्यात आले. कपिलचा शो प्रेक्षकांना पाहायला मिळणार नसल्यामुळे त्याच्या सगळ्या फॅन्सना अतिशय वाईट वाटले होते. पण याच कार्यक्रमाच्या टीमला सोबत घेऊन कपिलने द कपिल शर्मा शो लोकांसमोर आणला आणि लोकांना तो कार्यक्रमदेखील प्रचंड आवडत आहे. द कपिल शर्मा शोची निर्मितीदेखील कपिलचीच आहे. या दोन कार्यक्रमाच्या यशानंतर आता कपिल शर्मा 2017 या वर्षात दोन कॉमेडी कार्यक्रमांची निर्मिती करणार आहे आणि याची घोषणा त्याने स्वतः ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरून केली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "या वर्षातली सगळ्यात पहिली बातमी मी तुम्हाला सगळ्यांना देत आहे...के नाइन हे माझे प्रोडक्शन हाऊस लवकरच दोन कॉमेडी कार्यक्रमांची निर्मिती करणार आहे. तुम्हाला हे कार्यक्रम आवडतील अशी मला आशा आहे."