Jui Gadkari: मराठी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. 'ठरलं तर मग' या मालिकेत त्या 'पूर्णा आजी'ची भूमिका साकारत होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेच्या टीमला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. याच दरम्यान, मालिकेचे ९०० भाग पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अभिनेत्री जुई गडकरीने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ज्योती चांदेकर यांच्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं.
जुईने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "आज 'ठरलं तर मग'चे ९०० भाग पूर्ण झाले आहेत. आज सेटवर केक कापून आणि आजीच्या नावाचं 'सदाफुली' लावून आम्ही दिवस साजरा केला. ती हे बघायला हवी होती, पण तिचे आशीर्वाद नक्कीच आहेत. तीच्या अशा अचानक जाण्याने बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागल्या.. सीन फिरवावे लागले.. अजुनही आम्ही आणि कथानक यातुन सावरतोय…" असं म्हटलं.
पुढे जुईनं आपल्या चाहत्यांना विश्वास दिला की लवकरच त्यांना त्यांच्या पसंतीचे कथानक पाहायला मिळेल. तिने प्रेक्षकांना 'ठरलं तर मग' वरचं प्रेम आणि विश्वास असाच कायम ठेवण्याचे आवाहन केलं. तिनं म्हटलं, "तुम्ही जी साथ देताय, त्याला सलाम. तुम्हाला जे बघायचंय ते लवकरच दिसेल… तोपर्यंत तुमचं प्रेम... तुमचा 'ठरलं तर मग' वरचा विश्वास… तुमची साथ अशीच राहुद्या... ॥जय गुरुदेव दत्त॥". जुईच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि मालिकेच्या टीमला आधार दिला आहे.