Aai Tuljabhavani Serial: 'कलर्स मराठी'वरील 'आई तुळजाभवानी' या मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरी देवीच्या भेटीला येणार आहे. पार्वतीचा एकटेपणा दूर करण्यासाठी महादेवांनी ही दैवी रचना रचली आहे. अशोकसुंदरीच्या येण्याने आई तुळजाभवानीच्या वैयक्तिक आयुष्यात घडणारा बदल आणि भक्तरक्षणाच्या कार्यात तिला मिळणारी साथ हा अत्यंत रंजक असा माया, ममता, शौर्य यांचा मिलाफ असलेला अनोखा कथाभाग पाहायला मिळेल. अभिनेत्री राधा धारणे या मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरीच्या भूमिकेत झळकणार आहे.
आपल्या पात्राबद्दल बोलताना राधा धारणे म्हणाली, "आजवर मी अनेक मालिका केल्या आहेत. याचसोबत मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. या अभिनय प्रवासातला महत्वाचा टप्पा आता सुरू होतो आहे आणि तो म्हणजे मी कलर्स मराठीवरील 'आई तुळजाभवानी' मालिकेत शिवकन्या अशोकसुंदरी साकारणार आहे. मला हे पात्र खूपच आवडले आहे. यासाठी माझा लूक अत्यंत सुंदर आहे. तिची ज्वेलरी आणि कॉस्च्यूम खूप अप्रतिम करण्यात आले आहे.
पुढे राधा धारणे म्हणाली, "या पात्रासाठी मी तयारी देखील करते आहे. माझी भाषा, वाक्प्रचार, उच्चार यासाठी विशेष तयारी करतं आहे. नुकताच आम्ही प्रोमो शूट केला. ज्यामध्ये खूप वेगळेपण जाणवले. एक सकारात्मक दैवी ऊर्जा काय असते. याचा प्रत्यय मला आला. मी अशोक सुंदरी साकारण्यासाठी खूप उत्सुक आहे मला खात्री आहे प्रेक्षक देखील असतीलच."
दरम्यान, आई तुळजाभवानी आपल्या कलर्स मराठीवर वाहिनीवर आणि दररोज रात्री ९.०० वा.प प्रसारित होते. येत्या २३ डिसेंबरला प्रेक्षकांना हा भाग पाहता येणार आहे.