Join us
Daily Top 2Weekly Top 5

वो अपना सा या मालिकेत उष्मा राठोडने घेतली शालिनी अरोराची जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 15:45 IST

वो अपना सा ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. ...

वो अपना सा ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. नात्यांच्या चढउतारीवर भाष्य करणाऱ्या या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. या मालिकेत काकी माँ ही भूमिका शालिनी अरोरा साकारत आहे. शालिनीच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी पसंतीदेखील दिली होती. पण आता शालिनीच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे तिने या मालिकेला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. शालिनी काही कामांमध्ये व्यग्र असल्याने तिला या मालिकेसाठी तारखा देणे शक्य होत नाहीये. त्यामुळे ती ही मालिका सोडत असून तिने याबाबत प्रोडक्शन हाऊसला सांगितले आहे आणि आता या मालिकेत तिची जागा उष्मा राठोड घेणार आहे. या भूमिकेविषयी उष्मा सांगते, "या मालिकेतील काकी माँ ही भूमिका अतिशय साधी असल्याने मी ही भूमिका साकारण्यास खूप उत्सुक आहे. आतापर्यंत मी साकारलेल्या सगळ्या भूमिकांपेक्षा ही भूमिका खूपच वेगळी भूमिका आहे. एक कलाकार म्हणून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असे मला वाटते. ही भूमिका मला खूप आवडल्याने मी या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेच्या चित्रीकरणाला मला खूप मजा येत आहे. या मालिकेच्या सेटवर माझ्या या आधीच्या एका मालिकेचे चित्रीकरण झाले होते. त्यामुळे या सेटवर गेल्यावर माझ्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शालिनीला या भूमिकेत प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली असल्याने प्रेक्षक मला कितपत स्वीकारतील याचे मला टेन्शन आले आहे. पण मी माझे 100 टक्के या भूमिकेला देण्याचा प्रयत्न करणार आहे."