Join us

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पत्र मिळाल्याने हरखून गेली ‘गोपी बहू’; वाचा सविस्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 22:47 IST

सुपरस्टार रजनीकांत, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र मिळाल्यानंतर ...

सुपरस्टार रजनीकांत, टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र मिळाल्यानंतर एका टीव्ही अभिनेत्रीलाही पंतप्रधानांचे पत्र प्राप्त झाले आहे. ही टीव्ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून ‘साथ निभाना साथिया’मधील गोपी बहू अर्थात देवोलीना भट्टाचार्जी आहे. याबाबतची माहिती स्वत: देवोलीना हिनेच तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. याकरिता तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले आहेत. देवोलीना घराघरात ‘गोपी बहू’ नावाने प्रसिद्ध आहे. अशात ती जर ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाशी जोडली गेली तर घराघरातील लोक स्वच्छता अभियानात सहभागी होण्याची शक्यता आहे. कदाचित याच कारणामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देवोलीनाला पत्र पाठवून तिला या अभियानात सहभागी होण्याचा आग्रह केला आहे. देवोलीनाला जेव्हा हे पत्र प्राप्त झाले तेव्हा ती आनंदाने हरखून गेली. तिने लगेचच ट्विटरवर याबाबतची माहिती देत आनंद व्यक्त केला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महत्त्वाकांक्षी अभियानात आतापर्यंत पत्रकार, पुढारी, कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक आदी सहभागी झाले आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधानांचे पत्र प्राप्त होताच ही मंडळी ते पत्र सोशल मीडियावर पोस्ट करीत असल्याने त्यांचे चाहतेही या अभियानाशी जोडले जात आहेत. काही वेळापूर्वीच सुपरस्टार रजनीकांत यांनी पंतप्रधानांच्या या अभियानाला समर्थन देणारे ट्विट केले. त्याचबरोबर अनुष्का शर्मा हिनेदेखील या अभियानाशी जोडली गेल्याचा आनंद व्यक्त केला. रितेश देशमुख याने हे पत्र शेअर करीत पंतप्रधानांचे आभार मानले. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, ‘येत्या गांधी जयंतीला म्हणजेच २ आॅक्टोबर रोजी देशभर स्वच्छता अभियानाचे व्यापक स्वरूप करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करायचे आहे. २ आॅक्टोबर २०१४ रोजी मोदी यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानाची व्यापक सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत अनेक प्रसिद्ध व्यक्ती या अभियानाला जोडले गेले होते.