Join us  

'पैशासाठी गेला…', ओंकार भोजनेचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडून जाण्यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 3:37 PM

Onkar Bhojane : ओंकार भोजनेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडल्यामुळे चाहते खूप नाराज झाले होते.

आपल्या विनोदाने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार भोजने (Onkar Bhojane) गेली काही वर्षे सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून खळखळून हसवले. या कार्यक्रमाचा आणि पर्यायाने ओंकार भोजनेचा देखील चाहतावर्ग मोठा आहे. पण काही दिवसांपूर्वी त्याने एक धक्कादायक निर्णय घेतला. तो 'फू बाई फू' या कार्यक्रमात गेला. त्यावरून त्याच्यावर टीका देखील झाली. आता 'फू बाई फू' कार्यक्रम लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. यावरच 'हास्यजत्रा' चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी एका मुलाखतीत आपले स्पष्ट मत मांडले आहे.

सचिन गोस्वामी म्हणाले की, 'ओंकार भोजने हा उत्कृष्ट अभिनेता आहे. तो हास्यजत्रेत जेव्हा आला तेव्हाही त्याच्याकडे उत्तम क्षमता होती. त्याआधीही त्याने काही ठिकाणी काम केली होती. त्याची वैशिष्ट्यं हेरता आली आणि त्यापद्धतीने पेरता आली तर तो उत्तमच ठरणार आहे. तो एका प्रोडक्शनमधून दुसऱ्या प्रोडक्शनमध्ये जाणं यात काही गैर नाही. पण ज्या पद्धतीने लोकांनी ते मनाला लावून घेतलंय तसं मला काही फारसं वाटत नाही. एखाद्या नटाने कार्यक्रम सोडून जाणं यात काहीही अडचण नाही.

ते पुढे म्हणाले की, ओंकार हा चित्रपटासाठी गेला होता आणि तो तेच सांगून गेला होता. आशिष पाथरे हा ओंकारचा फार चांगला मित्र आहे. त्याने त्याला सुरुवातीच्या काळात मदत केली. त्याची जाणीव ठेवणं हे आवश्यक आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा उत्तम सुरु आहे. त्यामुळे आशिषच्या प्रोडक्शनला हातभार लावूया, फेमचा थोडासा वापर करुया, या उद्देशाने आणि मित्राला मदत करण्याच्या हेतून तो कदाचित तिथे गेला असावा. पण अनेक लोकांनी तो पैशासाठी गेला वैगरे अशी टीका केली. पण याबद्दल मला खरंच काहीही माहिती नाही. मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. त्याचे परिणाम काय होतात.. हा तो संच, चॅनल आणि त्यांचा अंतर्गत भाग आहे. पण आम्हाला कोणालाही त्याबद्दल काहीही राग वैगरे नाही.

फक्त त्याने त्याबद्दल आधी येऊन सांगितलं असतं तर बरं वाटलं असतं. यापूर्वीही त्याने असं केलं होतं. तेव्हा आम्ही त्याला जा असे सांगितले होते. त्यानंतरही तो हास्यजत्रेत आला आणि आम्ही त्याला सामावून घेतलंही. कारण ओंकारवर फक्त एकटा तोच काम करत नाही. संपूर्ण टीम त्यावर काम करत असते. लेखकांची आठ जणांची टीम, आम्ही, सहकलाकार हे सर्वजण एकत्र येऊन एक कलाकृती तयार होते, असे गोस्वामी यांनी सांगितले.

कदाचित तो शो नवीन आहे. त्याला तिथे सेट व्हायला वेळ लागेल. तो होईल त्यात काही दुमत नाही. पण तिथला परफॉर्मन्स आणि या ठिकाणचा परफॉर्मन्स याची तुलना करण्याची माझी इच्छा नाही. पण लोक ट्रोल करतात याचं मला वाईट वाटतं. त्यांना त्यांचे स्वातंत्र्य द्यायला हवं, असे मत सचिन गोस्वामी यांनी मांडले.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा