गणेशोत्सवातला माहोल खरं तर महिना-दीड महिना आधीपासूनच अनुभवायला मिळत असतो. सर्वत्र त्याचीच चर्चा, वातावरण असतं. गणेशोत्सव हा सगळ्यांच्या आवडीचा उत्सव आहे. आज लाडक्या बाप्पाचे स्वागत करण्यासाठी भाविक सज्ज झालेत. बॉलिवूडसह मराठी मनोरंजन विश्वात गणेशोत्सवाचा उत्साह वेगळाच दिसून येतो. मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान होतात. सर्वांची लाडकी अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) यंदा गणेशोत्सवासाठी खास तयारी केली आहे. लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी तिने जय्यत तयारी केल्याचं समोर आलं आहे.
रुपालीनं नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती बाप्पाच्या स्वागतासाठी लगबग करताना दिसत आहे. रुपालीनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या घराला फुलांनी आणि दिव्यांनी सुंदर सजवलेलं दिसतंय. बाप्पाची मूर्ती ठेवण्यासाठी तिने खास मखर (Makahar) तयार केला आहे, जे खूपच आकर्षक वाटत आहे. या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिनं लिहलं, " गणपती बाप्पा मोरया... आतुरता आगमनाची". तिने शेअर केलेल्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केलाय.
गणेश चतुर्थी हा रुपालीच्या आवडत्या सणांपैकी एक आहे आणि दरवर्षी ती उत्साहात तो साजरा करते. यावर्षीही तिचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दरम्यान, रुपाली भोसले हा मराठी टेलिव्हिजनवरील लाडका चेहरा आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे रुपालीला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने संजना हे खलनायिकेचं पात्र साकारलं होतं. तिने साकारलेल्या खलनायिकेच्या भूमिकेलाही चाहत्यांनी पसंती दर्शविली. रुपालीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'बिग बॉस मराठी'मध्येही ती सहभागी झाली होती. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवर 'लपंडाव' मालिकेत काम करतेय.