Join us

कपाळावर जखम, रक्ताचे डाग अन् थकलेला चेहरा; मराठी अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 15:19 IST

प्रेमाची गोष्ट फेम अभिनेत्री अपूर्वी नेमळेकरची अशी अवस्था पाहून तिचे चाहते चांगलेच हैराण झाले आहेत. काय घडलंय नेमकं याचा अनुभव अपूर्वानेच सोशल मीडियावर शेअर केलाय

अपूर्वा नेमळेकर (apurva nemlekar) सध्या 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत (premachi goshta serial) अभिनय करतेय. अपूर्वा या मालिकेत सावनीची भूमिका साकारतेय. अपूर्वाची भूमिका खलनायकी असली तरी तिच्या भूमिकेला लोकांचं चांगलंंच प्रेम मिळतंय. अपूर्वा या भूमिकेसाठी किती मेहनत घेते, हे ती पोस्टद्वारे वेळावेळी सांगत असते. अशातच अपूर्वाने सोशल मीडियावर चेहऱ्यावर रक्ताचे डाग असलेला एक फोटो शेअर केलाय. सध्या मालिकेत सावनीचं अपहरण होतं असा ट्रॅक सुरु आहे. यावेळी अपूर्वाने किती मेहनत केली, याचा अनुभव तिने सर्वांसोबत शेअर केलाय.

अपूर्वाने फोटो शेअर करुन लिहिलंय की, "काल मी एका अत्यंत कठीण अशा अपहरणाच्या सीनचं शूट करत होते. ४० अंशांहून अधिक तापमानात हे शूटिंग झालं. त्या तळपत्या  उन्हात, जड साडी परिधान करून, घामाने पूर्ण भिजून, चेहऱ्यावर कृत्रिम रक्त, थकलेलं शरीर आणि धुळीच्या जमिनीवर कोसळणं... अशा अवस्थेतसुद्धा मला माझ्या भूमिकेत शांत, शक्तिशाली आणि सुसंगत दिसायचं होतं. हे सोपं नव्हतं... पण मी ते केलं."

"त्या क्षणी मला पुन्हा एकदा जाणवलं की या सगळ्यामागे असलेली खरी प्रेरणा म्हणजे माझं कामावरील प्रेम. हाच तो ज्वाळेसारखा उत्साह आहे, जो मला माझ्या मर्यादा पार करण्याची ताकद देतो, प्रामाणिकपणे परफॉर्म करायला भाग पाडतो आणि प्रत्येक सीनला पूर्ण मनाने स्वीकारायला शिकवतो. मग तो सीन कितीही शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या कठीण असो."

"ही आमच्या कामाची खरी बाजू आहे, ज्या गोष्टी प्रेक्षक फारच क्वचित पाहतात. हीच ती झुंज, ती चिकाटी आणि आमच्या कलेप्रती असलेलं निःशब्द प्रेम! या सगळ्या संघर्षांनंतरही मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. कारण मी त्या व्यवसायात आहे, जिथे मला दररोज नवीन जीवन जगायला मिळतं, नवनवीन भावना अनुभवायला मिळतात आणि वेगळ्या कथा सांगून लोकांशी जोडता येतं."

"प्रत्येक सीनसह मी माझं हे वेगळं आयुष्य जिवंत करते आहे. हे आयुष्य प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेने भरलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे. माझ्या कामाबद्दल मी कृतज्ञ आहे. कारण प्रत्येकालाच त्यांच्या आवडीनुसार काम करता येतं असं नाही. पण मला मिळतं. प्रत्येक नवीन भूमिकेत, प्रत्येक नवीन भावना अनुभवताना, मला जाणवतं, मी खरोखर भाग्यवान आहे. मी माझं स्वप्न जगतेय, एक सीन करत करत..."

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरटेलिव्हिजन