Join us  

'चला हवा येऊ द्या' नंतर कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे सध्या काय करतेय, तुम्हाला ठाऊक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 10:38 AM

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे.

मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे श्रेया बुगडे. आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'चला हवा येऊ द्या'मधून श्रेया बुगडे हे नाव घराघरांत पोहोचलं.  तब्बल दहा वर्षे या शोनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आता हा शोनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर मात्र श्रेया काय करते, ती कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला. अखेर आता या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना मिळालं आहे.

'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमानं निरोप घेतल्यानंतर अभिनेता कुशल बद्रिके, भाऊ कदम, निलेश साबळे यांनी आपली वेगळी वाट निवडली. भाऊ कदम आणि निलेश साबळे यांनी 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' हा नवा कार्यक्रम सुरू केला आहे. तर कुशल बद्रिके हा सोनी टीव्ही या वाहिनीवरील 'मॅडनेस मचायेंगे' या हिंदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर श्रेयानेही आपला नवा प्रवास सुरू केला आहे. 

श्रेया सध्या आर जे म्हणजेच रेडिओ जॉकी बनली आहे. एका नव्या कार्यक्रमातून श्रेया चाहत्यांच्या भेटीला येत आहे. श्रेया बुगडेचा बिग एफ एमवर नवाकोरा 'बिग हा हा हा कार' हा कार्यक्रम सूरु झाला आहे. हा कार्यक्रम सोमवार ते शनिवार सायंकाळी ५ ते ७ प्रक्षेपित करण्यात येतो. याचा एक व्हिडीओ श्रेयानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या नव्या प्रवासासाठी चाहत्यांनी तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत. 

याशिवाय, काही दिवसांपूर्वीच श्रेयाने आपल्या नव्या रेस्टॉरंटचा शुभारंभ केला आहे. अभिनयाबरोबर श्रेयाने हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आहे. नुकतेच तिने आपले  मुंबईतील दादर परिसरात स्वत:चे रेस्टॉरंट उघडले आहे.  'द बिग फिश अँड कंपनी' असं श्रेयाच्या हॉटेलचं नाव आहे.  तिचं हे रेस्टॉरंट सीफुड साठी स्पेशल आहे. त्यामुळे खवय्यांची नक्कीच चंगळ असणार आहे. 

टॅग्स :श्रेया बुगडेसेलिब्रिटीमराठी अभिनेतासोशल मीडिया