युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्माचा (Dhanashree Verma) घटस्फोट सर्वात चर्चेतल्या घटस्फोटांपैकी एक होता. हार्दिक पांड्या-नताशाच्या घटस्फोटानंतर युझीच्या घटस्फोटाने सर्वांनाचल धक्का बसला होता. घटस्फोटाच्या दिवशी कोर्टातून बाहेर येताना युजवेंद्रने घातलेल्या टीशर्टवर एक मेसेज लिहिला होता. 'बी युअर ओन शुगर डॅडी' असा तो मेसेज होता. हा मेसेज म्हणजे त्याने धनश्रीला मारलेला टोमणाच होता. युजवेंद्रच्या या कृतीची खूप चर्चा झाली. आता धनश्री वर्माने पहिल्यांदाच त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
'ह्युमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या मुलाखतीत धनश्री वर्मा म्हणाली, "घटस्फोट हा काही सेलिब्रेट करण्याचा क्षण नाही. तो खूप दु:खद क्षण असतो. फक्त दोन जणांसाठी नाही तर दोघांच्या कुटुंबासाठीही तो वाईट क्षण असतो. जे तुमचे आपले आहेत सगळेच दु:खी असतात. आपण आपलीच एक लढाई लढत असतो आणि कित्येक मीडियाचं तुमच्यावर लक्ष असतं. मी या प्रक्रियेत खूप नॉर्मल वागले. मी काहीही असं केलं नाही ज्याने मी लक्ष वेधून घेईन. आपण आपले संस्कार विसरु नये. लग्न करतो तेव्हा खूप प्रेम असतं. पण जेव्हा ते संपतं तेव्हा समोरच्याचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार मिळतो असं होत नाही."
ती पुढे म्हणाली, "जे झालं ते माझ्यासाठी खूप भावनिक होतं. माझ्या कुटुंबासाठीही भावनिक होतं. मला आठवतंय जेव्हा मी कोर्टात उभी होते आणि जजमेंट दिलं गेलं तेव्हा मी रडायला लागले. हे होणार माहित होतं. आमची मनाची तयारी होती पण तरी मला रडू आलं. मग सगळं झाल्यावर तो आधी बाहेर गेला. मग ते सगळं टी शर्ट स्टंट झाला. मी आतमध्ये असल्याने मला काहीच माहित नव्हतं. मी बाहेर आले आणि कारमध्ये बसले. मागच्या गेटने आम्ही बाहेर गेलो. कारण मी तर नॉर्मल टीशर्ट घातला होता. मला तर काहीही दाखवायचं नव्हतं. माझा बेस्ट फ्रेंड माझ्यासोबत होता. आम्ही हे सगळं झाल्यावर शांत बसून श्वास घेण्याचा प्रयत्न करत होतो. टी शर्ट स्टंटच्या आधीच लोक मलाच दोष देणार याची मला कल्पना होतीच. मी मोबाईल काढला आणि मला दिसलं तेव्हा मी म्हटलं काय? खरंच याने असं केलंय? माझ्या मनात लाखो विचार येऊन गेले. असं वाटलं की अरे हेच सांगायचं होतं तर व्हॉट्सअॅपच केलं असतंस. त्या क्षणी मी ठरवलं आता सगळं संपवं. मी रडणार नाही. मी यासाठी का रडत होते? हे संपवूया. मला उलट त्या क्षणाने प्रेरणा दिली की आता फक्त हसायचं आहे."