'ससुराल सिमर का' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री दीपिका कक्कड (Deepika Kakar) गंभीर आजाराचा सामना करत आहे. तिचा पती अभिनेता शोएब इब्राहिमनेच (Shoaib Ibrahim) याचा खुलासा केला. दीपिका लिवर ट्युमरशी झुंज देत असून हे आमच्या सर्वांसाठीच धक्कादायक आहे असं तो म्हणाला. आपल्या व्लॉगमधून शोएबने ही माहिती दिली. दीपिका आणि शोएबला दीड वर्षाचा रुहान हा मुलगाही आहे.
दीपिका कक्कर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'मध्ये दिसत होती. मात्र तब्येतीच्या कारणांमुळे तिने शो अर्ध्यातच सोडला. तिला बऱ्याच काळापासून पोटदुखीचा त्रास होत होता. त्रास वाढत होता म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. इन्फेक्शन असल्याचं निदान करत डॉक्टरांनी तिला गोळ्या दिल्या. मात्र तरी बरं वाटेना म्हणून ती पुन्हा रुग्णालयात गेली. स्कॅन केल्यानंतर ट्युमरविषयी समजलं.
व्लॉगमध्ये शोएब म्हणाला, "आमच्या डॉक्टरांनी आम्हाला पुन्हा बोलवलं होतं. त्यांनी सिटी स्कॅन केलं आणि दीपिकाच्या लीव्हरमध्ये डाव्या बाजूला ट्युमर असल्याचं लक्षात आलं. टेनिस बॉलच्या आकाराएवढा तो ट्युमर आहे. आमच्या कुटुंबासाठी हे खूपच धक्कादायक होतं."
तीन दिवसांपासून दीपिका रुग्णालयात आहे. तिच्या आणखी काही टेस्ट व्हायच्या आहेत. सुदैवाने रिपोर्टमध्ये कॅन्सरसारखं काहीही आलेलं नाही. आणखी काही टेस्टनंतर तिच्यावर सर्जरी करण्यात येईल. सध्या त्यांचा मुलगा रुहान ब्रेस्ट फीडिंगवरच आहे. त्यामुळे दोघांनाही रुहानची चिंता आहे. दीपिकासाठी सगळ्यांनी प्रार्थना करा अशी विनंती शोएबने केली आहे.