क्रिस्टल डिसूझा बनली बेलनवाली बहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 13:12 IST
कलर्स या वाहिनीवर प्रेक्षकांना बेलनवाली बहू ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे. ही एक कॉमेडी मालिका असून यात रूपा ...
क्रिस्टल डिसूझा बनली बेलनवाली बहू
कलर्स या वाहिनीवर प्रेक्षकांना बेलनवाली बहू ही नवी मालिका पाहायला मिळणार आहे. ही एक कॉमेडी मालिका असून यात रूपा अवस्थी आणि अमरनाथ या विजोड जोडप्याची कथा दाखवली जाणार आहे. या दोघांच्या आयुष्यात लाटणं कशी महत्त्वाची भूमिका बजावतं हे प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत बेलनवाली बहू ही मुख्य भूमिका क्रिस्टल डिसूझा साकारत आहे. ती या मालिकेत रूपा अवस्थीची प्रमुख भूमिका साकारत असून धीरज सरना तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. धीरजने आजवर अभिनेता, निर्माता आणि लेखक अशा विविध भूमिका छोट्या पडद्यावर पार पाडल्या आहेत.क्रिस्टल डिसूझाने तिच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण तिने कधीच कोणत्या कॉमेडी मालिकेत काम केलेले नाहीये. त्यामुळे या मालिकेत काम करण्याचा क्रिस्टलचा अनुभव खूपच वेगळा आहे. याविषयी क्रिस्टल सांगते, या मालिकेची पटकथा वाचल्यानंतर मी या पटकथेच्या प्रेमातच पडले होते. आजवर मी अशाप्रकारची भूमिका कधीच साकारली नसल्याने मी लगेचच या भूमिकेसाठी होकार दिला. रूपाचा वेंधळा स्वभाव मला खूपच आवडला. कारण मी देखील अनेकवेळा माझ्या खऱ्या आयुष्यात वेंधळ्यासारखी वागते. मी आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण मला काहीतरी वेगळे आणि नवीन करून पाहायचे होते. त्यामुळे कॉमेडी मालिकेबद्दल मला विचारण्यात आले असता मी लगेचच होकार दिला. माझ्या फॅन्सने मला आजवर कधीच अशा भूमिकेत पाहिले नसल्याने त्यांना माझी ही भूमिका नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. अमरनाथची भूमिका साकारणारा धीरज सरना त्याच्या भूमिकेविषयी सांगतो, “मला लिहिण्याची, अभिनयाची आणि निर्मितीची आवड आहे याचा मला आनंद वाटतो. लड्डू हा नेहमीचा रोमँटिक किंवा पुरूषी अहंकारी मनुष्य नाही. जरी माझे पात्र खडूस असले तरी त्यामध्येही पंच आहे. लग्नानंतर सर्व नवरे सारखेच असतात आणि त्यांना त्यांच्या बायकांची किंमत कळत नाही आणि ते त्यांना गृहीत धरतात असे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळणार आहे.