दुहेरी मालिकेच्या सेटवर रंगतो क्रिकेटचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2017 17:48 IST
मालिकेचे चित्रीकरण करत असताना कलाकारांचा संपूर्ण दिवस हा मालिकेच्या सेटवरच जातो. मालिकेचे चित्रीकरण म्हटले की कलाकारांना दिवसातले 10-12 तास ...
दुहेरी मालिकेच्या सेटवर रंगतो क्रिकेटचा सामना
मालिकेचे चित्रीकरण करत असताना कलाकारांचा संपूर्ण दिवस हा मालिकेच्या सेटवरच जातो. मालिकेचे चित्रीकरण म्हटले की कलाकारांना दिवसातले 10-12 तास चित्रीकरणाला द्यावे लागतात. कलाकार आपल्या घरापेक्षाही जास्त वेळ मालिकेच्या सेटवर घालवत असल्याने आपल्या सहकलाकारांसोबत त्यांचे एक वेगळे नाते निर्माण होते. अनेकवेळा आपले दृश्य येईपर्यंत कलाकारांना कित्येक तास वाट पाहावी लागते. त्यामुळे या वेळात काही जण आपल्या मेकअप रूममध्ये आराम करतात तर काहीजण या वेळात पुस्तक वाचत असतात किंवा एखादा चित्रपट, मालिका अथवा वेबसिरीज त्यांच्या मोबाईलमध्ये पाहातात. काही मालिकांच्या टीमवर तर गप्पांचे फड रंगतात अथवा काही खेळ खेळले जातात.दुहेरी ही मालिका सुरू होऊन आता अनेक महिने झाले आहेत. त्यामुळे या मालिकेच्या टीममधील सगळेच कलाकार एखाद्या कुटुंबाप्रमाणे झाले आहेत. त्यामुळे चित्रीकरणाच्या मिळणाऱ्या ब्रेकमध्ये ते मजामस्ती करतात. एकमेकांसोबत खूप साऱ्या गप्पा मारतात. पण त्याचसोबत ब्रेकमध्ये अथवा शॉर्टच्या दरम्यान त्यांचे क्रिकेटचे सामनेदेखील रंगतात. दुहेरी या मालिकेच्या टीममधील मंडळींनी मालिकेच्या सेटवर एक बॅट आणि बॉल आणून ठेवली आहे. चित्रीकरणाच्या दरम्यान ब्रेक असल्यास अथवा काही कलाकारांचे चित्रीकरण नसल्यास ते कलाकार क्रिकेट खेळतात. केवळ पुरुषच नाही तर स्त्रियादेखील क्रिकेटच्या खेळात मग्न होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी नुकतेच दृष्यंतची भूमिका साकारणारा संकेत पाठक आणि इंदिरा सुर्यवंशीची भूमिका साकारणारी ज्योती जोशी यांनी क्रिकेट या खेळाचा चांगलाच आनंद लुटला. त्यांच्यासोबतच टीममधील अनेक जण खेळ खेळण्यात व्यग्र झाले होते. खेळ खेळल्यामुळे त्यांचा टाइमपास तर होतोच पण त्याचसोबत चित्रीकरणातून थोडासा आरामदेखील मिळतो.