'वचन दिले तू मला' या नव्या मालिकेत कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळणार आहे. ही गोष्ट आहे हुशार, हजरजबाबी, धाडसी अॅडव्होकेट ऊर्जाची आणि तिच्या न्यायासाठीच्या लढाईत खंबीरपणे साथ देणाऱ्या अॅडव्होकेट शौर्यची. एका संवेदनशील छेडछाड प्रकरणात ऊर्जा निर्धाराने उभी राहते. तिच्यासमोर उभा असतो निष्णात वकील हर्षवर्धन जहागीरदार. प्रचंड अहंकारी असलेला हर्षवर्धन पराभव स्वीकारु शकत नाही. जेव्हा ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हर्षवर्धनच्या विरोधात उभी रहाते तेव्हा त्याच्या याच अहंकाराला ठेच पोहोचते आणि तिथूनच सुरुवात होते नव्या लढ्याला. अभिनेत्री अनुष्का सरकटे आणि अभिनेता इंद्रनील कामत ही नवी जोडी या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. शशांक सोळंकी यांच्या सेवेन्थ सेन्स मीडिया या निर्मिती संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.
ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे हे पात्र साकारण्यासाठी अभिनेत्री अनुष्का सरकटे प्रचंड उत्सुक आहे. ''पहिल्यांदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय त्याचा वेगळा आनंद आहे. क्षणात आपलसं करुन घेतलं संपूर्ण टीमने. ऊर्जा ही एका प्रामाणिक वकिलाची मुलगी आहे. भ्रष्ट न्यायव्यवस्थेमुळे तिच्या वडिलांनी सर्व काही गमावलं अगदी त्यांचा जीवही. ऊर्जा आजही त्यांची जिद्द, त्यांची मूल्यं आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं ध्येय आपल्या मनात जपून आहे. प्रेक्षकांना हे पात्र नक्की आवडेल अशी भावना अनुष्काने व्यक्त केली.'' अभिनेता इंद्रनील कामत म्हणाला,''ॲडव्होकेट शौर्य जहागिरदार हे पात्र मी साकारणार आहे. अतिशय प्रेमळ आणि सज्जन असा हा शौर्य आहे. पहिल्यांदा अश्या पद्धतीचं पात्र साकारणार आहे त्यामुळे खूप उत्सुकता आहे.''
स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ''सामाजिक बांधिलकी आणि करमणूक असा सुवर्णमध्य साधणारी ही नवी मालिका. एक बिनधास्त, शूर, हुशार, हजारजबाबी आणि सामान्य परिस्थितीतली मुलगी पण प्रामाणिकपणे स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द असणारी ‘ऊर्जा’ या मालिकेचं मोठं आकर्षण असेल. अशा मनाला भिडणाऱ्या ऊर्जाला जेव्हा शौर्यची साथ मिळते तेव्हा तिचा प्रवास नेमका कसा होतो हे मालिकेतून उलगडत जाईल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, याची खात्री आहे.'' 'वचन दिले तू मला' ही मालिका १५ डिसेंबरपासून रात्री ९.३० वाजता स्टार प्रवाहवर भेटीला येणार आहे.
Web Summary : ‘Vachan Dile Tu Mala’ features a courtroom drama with advocates fighting for justice. Anushka and Indraneel play leads. The story revolves around a lawyer determined to fight against corruption. The series starts December 15th on Star Pravah.
Web Summary : ‘वचन दिले तू मला’ में कोर्ट रूम ड्रामा है, जिसमें वकील न्याय के लिए लड़ते हैं। अनुष्का और इंद्रनील मुख्य भूमिका में हैं। कहानी भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने के लिए दृढ़ एक वकील के इर्द-गिर्द घूमती है। यह श्रृंखला 15 दिसंबर से स्टार प्रवाह पर शुरू होगी।