Join us  

मुख्यमंत्री साहेब! प्रसाद ओकच्या नव्या घरी एकनाथ शिंदे, अभिनेता म्हणतो - ज्या पद्धतीने तुम्ही “माणूस” जोडता आहात...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 4:28 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रसादच्या या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी हजेरी लावली होती. प्रसादने याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारून मराठी सिनेसृष्टीत ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. मध्यमवर्गातून आलेल्या प्रसादने कलाविश्वाला त्याच्या टॅलेंटची दखल घेण्यास भाग पाडले. नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रसादने नवं घर घेतल्याची बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. नव्या घराचे काही फोटोही प्रसादने शेअर केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही प्रसादच्या या नव्या घराच्या वास्तूशांतीसाठी हजेरी लावली होती. प्रसादने याबाबत पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. 

प्रसादने त्याच्या सोशल मीडियावरुन एकनाथ शिंदेंबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिली आहे. 

प्रसाद ओकची पोस्ट

मुख्यमंत्री साहेब…!!!

माझ्यासारख्या एका छोट्या कलाकाराच्या विनंतीला मान देवून, तुम्ही दिलेला शब्द पाळलात आणि वास्तूशांतीच्या दिवशी आमच्या घरी आलात. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आलात. कोणताही राजकारणी अविर्भाव न ठेवता अगदी कुटुंबातलेच असल्याप्रमाणे आमच्या सोबत बसलात,जेवलात...

नीट निरखून आख्खं घर पाहिलंत...हा प्रसंग आमच्या सगळ्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला आहे. आपले गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या पावलावर पाऊल टाकत आपण ज्या पद्धतीने “माणूस” जोडता आहात ते पाहता “गुरुने दिला ज्ञानरुपी वसा…आम्ही चालवू हा पुढे वारसा” हे शब्द तंतोतंत खरे करताय असंच वाटलं..!!

साहेब…मनःपुर्वक आभार…!!! ओक कुटुंबीय.

प्रसाद ओकच्या घराच्या भींतीवर एकनाथ शिंदेंनी खास संदेशही लिहिला. प्रसादच्या घरातील भींतीवर "हार्दिक शुभेच्छा" असं लिहित मुख्यमंत्र्यांनी त्याखाली स्वाक्षरीही केली. प्रसादच्या या पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

टॅग्स :प्रसाद ओक एकनाथ शिंदेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार