स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'शिट्टी वाजली रे' (Shitti Vajli Re Show) हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन अमेय वाघ करताना दिसणार आहे. कलाकारांचं पाककौशल्य शिट्टी वाजली रेच्या मंचावरून पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. सहजरित्या आपल्या अभिनयाने आणि नृत्याने मनं जिंकणारे हे कलाकार स्वयंपाकात खरंच कुशल आहेत का याची पोलखोल शिट्टी वाजली रेचा मंच करणार आहे. या शोमध्ये दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि गौतमी पाटीलने हजेरी लावली आहे. त्यांचे सेटवरील फोटो शेअर करत हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.
हेमंत ढोमेने इंस्टाग्रामवर शिट्टी वाजली रेच्या मंचावरील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तो गौतमी पाटीलसोबत डान्स करताना दिसतो आहे आणि दुसऱ्या फोटोत अमेय वाघसोबत धमाल करताना दिसतो आहे. त्याने फोटो शेअर करत लिहिले की, पाटलांची नवी जोडी! सबसे कातील हेमंत ढोमे-पाटील सोबत शेफ गौतमी पाटील! हे मी का म्हणतोय यासाठी तुम्हाला…अमेय वाघ या माझ्या मित्राचा नवा कोरा शो ‘शिट्टी वाजली रे’ बघावाच लागेल… मनोरंजनाचा हा वाघ तिथे लय धुमाकूळ घालतोय!
त्याने पुढे लिहिले की, दोन भागांसाठी हक्काने आणि प्रेमाने पाहूणा म्हणून जायचा योग आला! पण खूप खूप मज्जा आली! गौतमी भेटूच लवकर, आता तुझ्यासोबत मलाही शोज करावे लागणार बहूतेक! स्टार प्रवाह या आपल्या घरच्या चॅनेलनी आणि आपल्या लाडक्या लोकांनी तुम्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जबरदस्त कार्यक्रम आणलाय… तुमचं धमाल मनोरंजन होणार हे नक्की! जरूर पहा ‘शिट्टी वाजली रे’ आजपासून… शनिवार आणि रविवार रात्री ९ वा. स्टार प्रवाह वर!