झी मराठीवर गाजलेला विनोदी कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya). सुमारे १० वर्ष या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके सगळेच स्टार झाले. नुकतीच या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा झाली. यावेळी दुसऱ्या पर्वात बरंच काही वेगळेपण दिसणार आहे. यंदा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ऑडिशन होत आहेत. आश्चर्य म्हणजे या पर्वात निलेश साबळे (Nilesh Sabale) सूत्रसंचालन करताना दिसणार नाहीत. त्यांची जागा आता 'या' अभिनेत्याने घेतली आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाची काही दिवसांपूर्वीच घोषणा झाली. यामध्ये कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि भारत गणेशपुरे असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच याची झलक दिसली. भाऊ कदम, सागर कारंडे न दिसल्याने चाहत्यांची निराशा झाली. तर आता निलेश साबळेही या नव्या पर्वाचा भाग नसणार आहेत असं समोर आलं आहे. मुंबई टाईम्सच्या वृत्तानुसार, अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. अभिजीतने याआधी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचं, ट्रेलर लाँच सोहळ्यांचं, प्रशासकीय कार्यक्रमांचंही सूत्रसंचालन केलं आहे. आता त्याच्यावर या गाजलेल्या शोच्या दुसऱ्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी आहे.
'चला हवा येऊ द्या'ने १० वर्ष प्रेक्षकांना खूप हसवलं. मात्र नंतर टीआरपी कमी झाल्याने शो बंद झाला. डॉ निलेश साबळे हे सूत्रसंचालनासोबतच मिमिक्री, लेखन आणि दिग्दर्शनही करायचे. तर आता प्रियदर्शन जाधव, अमोल पाटील आणि योगेश शिरसाट हे तिघांवर दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. तसंच कुशल, श्रेयासोबत गौरव मोरेही दिसणार आहे. याशिवाय ऑडिशनमधून निवड झालेले नवोदित कलाकारही झळकणार आहेत.