Breaking News : दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहिया या जोडीने ‘नच बलिए-८’च्या किताबावर कोरले नाव!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2017 21:28 IST
दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक याने ‘नच बलिए-८’चा किताब आपल्या नावे केला आहे. होय, सगळ्या स्पर्धकांना मागे टाकत दिव्यांका आणि विवेक दहियाने हे यश मिळविले आहे.
Breaking News : दिव्यांका त्रिपाठी अन् विवेक दहिया या जोडीने ‘नच बलिए-८’च्या किताबावर कोरले नाव!!
टीव्हीवरील प्रसिद्ध डान्स रिअॅलिटी शो ‘नच बलिए-८’चा आज ग्रॅण्ड फिनाले होत आहे. फिनालेसाठी सर्वच जोड्या उत्साहित असून, किताबावर कोण नाव कोरणार याबाबतची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र तुमची ही उत्सुकता आम्ही काहीशी कमी करणार आहोत. कारण या शोबाबत आमच्याकडे एक ब्रेकिंग न्यूज असून, ‘नच बलिए-८’च्या फिनालेमध्ये कोणी बाजी मारली हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आता अधिक उत्सुकता ताणून न घेता, दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दहिया याने ‘नच बलिए-८’चा किताब आपल्या नावे केला आहे. होय, सगळ्या स्पर्धकांना मागे टाकत दिव्यांका आणि विवेकने हे यश मिळविले आहे. ग्रॅण्ड फिनालेच्या रेसमध्ये दिव्यांका-विवेक, मोहित-सनाया आणि सनम-अबीगॅल या सेलिब्रिटी जोड्यांमध्ये घमासान रंगले. या तिन्ही जोड्यांनी ‘नच’च्या मंचावर एकमेकांना जबरदस्त फाइट दिली. हा शो जसा फिनालेकडे वळत गेला, तसा या तिन्ही जोड्यांमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू झाला. कोणाचेही नाव न घेता या जोड्यांनी एकमेकांवर निशाना साधला. या सोशल वॉरमध्ये दिव्यांका-विवेक आणि सनाया-मोहित हे या किताबावर नाव कोरतील असे वाटत होते. कारण दोन्ही जोड्यांनी एकमेकांचे उणे-दुणे काढून वर्चस्व दाखविण्याची एकही संधी सोडली नव्हती. दिव्यांका त्रिपाठीने तर तिच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी कधी पत्र लिहिले तर कधी व्हिडीओ शेअर केला. तसेच बºयाचदा फेसबुक लाइव्हवरही ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहिली. काही दिवसांपासूनच दिव्यांका आणि विवेकने सोशल मीडियावर धूम उडवून दिली. ग्रॅण्ड फिनालेसाठी चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी आणि प्रेक्षकांचे वोट मिळविण्यासाठी आपल्या डान्समध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. दिव्यांकाने तर हा किताब जिंकण्यासाठी चक्क चॅनलला धमकी दिली. जर मी ‘नच बलिए-८’चा किताब जिंकली नाही तर ‘ये हैं मोहब्बते’ ही मालिका सोडणार असल्याची धमकीच तिने दिली होती. असो, दिव्यांका आणि विवेकने वापरलेल्या या सगळ्या फॉर्म्युल्यांचे आता चीज होताना दिसत आहे. वास्तविक ही जोडी सुरुवातीपासून प्रेक्षकांची फेव्हरेट राहिली आहे. त्यामुळेच त्यांना ग्रॅण्ड फिनालेचे तिकीट मिळाले. फिनालेमध्येही या जोडीचा जलवा कायम राहिल्याने त्यांचे किताबावर नाव कोरले गेले आहे. विजेत्या जोडप्याला ३५ लाख रुपये, ट्रॉफी आणि बाईक भेट म्हणून देण्यात आली. या शोमध्ये दहा जोडप्यांनी भाग घेतला होता. त्यातील तीन जोडप्यांची ग्रॅण्ड फिनालेसाठी निवड करण्यात आली.