Bigg Boss 19 Premiere: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'बिग बॉस'चा १९ वा सीझन आजपासून सुरू होत आहे. नेहमीप्रमाणेच सुपरस्टार सलमान खान होस्ट करत असलेल्या या शोबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रीमिअर आज २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. हा शो तुम्ही टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
यंदा 'बिग बॉस १९' जिओ हॉटस्टार(Jio Hotstar) या ॲपवर लाईव्ह स्ट्रीम होणार आहे. विशेष म्हणजे, ओटीटीवर हा शो टीव्हीच्या सुमारे दीड तास आधी म्हणजेच रात्री ९ वाजता सुरू होईल. तर कलर्स टीव्हीवर तो १०:३० ला पाहता येईल. "घरवालों की सरकार" अशी या वर्षींची थीम आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस १९' ची चर्चा रंगली आहे. नव्या पर्वाबद्दल आणि यंदाच्या स्पर्धकांबद्दल 'बिग बॉस' प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. स्पर्धकांच्या यादीत प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अमाल मलिक,आवेज दरबार, तान्या मित्तल, नगमा मिरजकर आणि अश्नूर कौर, गौरव खन्ना यांच्यासह अनेकांच्या नावांची चर्चा आहे. चाहते सलमान खानला पुन्हा एकदा बिग बॉस होस्ट करताना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.
यावर्षी 'बिग बॉस'चा सीझन इतिहासातील सर्वात मोठा सीझन असणार आहे. याआधी शो साधारणपणे ऑक्टोबरमध्ये सुरू होऊन जानेवारीमध्ये संपत असे. मात्र, यंदा ऑगस्टमध्ये सुरू होत असल्याने तो पुढील ५ महिने म्हणजेच जानेवारीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाचा मोठा डोस मिळणार आहे. या सीझनमध्ये आणखी एक खास गोष्ट म्हणजे, सलमान खानसोबत आणखी दोन होस्ट दिसण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार, करण जोहर आणि फराह खान हे देखील 'बिग बॉस १९' होस्ट करताना दिसू शकतात. मात्र, याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही.
'बिग बॉस १९' कुठे आणि कधी पाहता येईल?तुम्ही 'बिग बॉस १९' कलर्स टीव्हीवर दररोज रात्री १०:३० वाजता पाहू शकता. जर तुम्हाला हा शो टीव्हीच्या आधी पाहायचा असेल, तर तुम्ही तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. 'बिग बॉस १९' टीव्हीच्या आधी ओटीटीवर प्रसारित करण्याचा निर्मात्यांचा निर्णय किती यशस्वी होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. प्रेक्षक या नव्या सीझनसाठी उत्सुक आहेत.