Join us

लग्नाला ९ वर्ष झाली तरी मूल नाही, गौरव खन्ना म्हणाला- "मला मूल हवंय, पण बायकोला नकोय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 14:32 IST

टीव्ही अभिनेता गौरव खन्नानेदेखील त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना अनेक गोष्टी 'बिग बॉस १९'च्या घरात सांगितल्या आहेत. 

Bigg Boss 19 : 'बिग बॉस १९' सुरू होऊन चार दिवस झाले आहेत. या पर्वात घरातील सदस्य एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 'बिग बॉस १९'च्या घरात एकमेकांशी बोलताना स्पर्धक स्वत:च्या आयुष्यातील अनेक नवे खुलासे करत आहेत. टीव्ही अभिनेता गौरव खन्नानेदेखील त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना अनेक गोष्टी 'बिग बॉस १९'च्या घरात सांगितल्या आहेत. 

'बिग बॉस १९'च्या घरात गार्डन एरियामध्ये मृदुल तिवारीशी बोलताना गौरव खन्नाने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं. तेव्हा गौरवने लग्नाला ९ वर्ष झाल्याचं सांगितलं. त्यावर मृदुलने त्याला मुलांबद्दल विचारलं. गौरव म्हणाला, "माझ्या बायकोला मूल नको आहे. मला मूल हवं आहे. पण आमचं लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे ती जे बोलेल ते ऐकावं लागतं. प्रेम केलंय तर शेवटपर्यंत निभवावंही लागेल".

पुढे तो म्हणाला, "तिचं म्हणणंही बरोबर आहे. कारण खूप जबाबदाऱ्या आहेत. आणि आम्ही दोघंच एकमेकांसाठी आहोत. जर मी दिवसभर कामासाठी बाहेर असेन आणि तिलादेखील काम मिळालं तर मग आम्ही आमचं मूल कोणाकडे ठेवायचं? कोणी दुसऱ्या व्यक्तीने आमच्या मुलाला सांभाळावं हे आम्हाला नकोय. मी तिला सांगितलं आहे की मला बाबा व्हायचंय. पण तिने सांगितलेल्या गोष्टीही मला पटतात". 

त्यानंतर मृदुलने गौरवला तिचं मतही हळूहळू बदलू शकेल, असं म्हटलं. त्यावर गौरवने तशीच अपेक्षा ठेवल्याचं म्हटलं. "हो नक्कीच आम्ही तेव्हा विचार करू. कधीच नाही म्हणू नये", असं गौरव म्हणाला. दरम्यान, बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धक त्यांची खेळी करताना दिसत आहेत. आता कोण टिकणार आणि कोणाला शोमधून बाहेर पडावं लागणार, हे पाहावं लागेल. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार