Join us

Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

By कोमल खांबे | Updated: August 25, 2025 11:08 IST

Bigg Boss 19 : प्रणितला बिग बॉसच्या घरात पाहताच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आता 'बिग बॉस १९'च्या घरात प्रणित कशी खेळी करणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. याचनिमित्ताने प्रणित मोरेने लोकमत फिल्मीशी एक्सक्लुझिव संवाद साधला. 

Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'चा ग्रँड प्रिमियर नुकताच पार पडला. 'बिग बॉस'च्या या नव्या पर्वाला सुरुवात झाली असून यंदाच्या पर्वात मराठमोळा कॉमेडियन प्रणित मोरेही स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. प्रणितला बिग बॉसच्या घरात पाहताच चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. आता 'बिग बॉस १९'च्या घरात प्रणित कशी खेळी करणार यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. याचनिमित्ताने प्रणित मोरेने लोकमत फिल्मीशी एक्सक्लुझिव संवाद साधला. 

'बिग बॉस १९'साठी पहिल्यांदा कॉल आल्यावर काय विचार डोक्यात आला? 

जेव्हा पहिल्यांदा 'बिग बॉस १९'साठी विचारणा झाली तेव्हा खूपच अनपेक्षित होतं. मला वाटलं होतं की रिएलिटी शोची ऑफर येईल पण, बिग बॉसची येईल असं ध्यानीमनी नव्हतं. एवढ्या लवकर 'बिग बॉस हिंदी'साठी विचारणा होईल असं वाटलं नव्हतं. मी लगेच या शोला हो म्हटलं नाही. खूप साऱ्या गोष्टींचा विचार केला. माझे शो लाइन अप होते ते सगळे पुढे ढकलावे लागले. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच शेवटी मग मी या शोसाठी हो म्हटलं. 

सलमान खानला सामोरं जाण्याचं दडपण आहे का ?

दडपण तर म्हणता येणार नाही. पण लहानपणापासून त्यांचे सिनेमे बघितलेत. त्यामुळे थोडा नर्व्हस आहे. त्यांची जशी पर्सनालिटी आहे ती मला चांगली वाटते. पण, कधी कधी ती पर्सनालिटी तुमच्या विरोधातही जाऊ शकते. मला वाटतं की मी जर रिअल राहिलो तर त्यांना नक्कीच आवडेन. 

एक मराठी माणूस हिंदी 'बिग बॉस'च्या घरात जातोय तर 'बिग बॉस'च्या घरात मराठी बाणा कसा जपशील? 

मला वाटतं मराठी बाणा जपण्यासाठी काही वेगळं स्पेसिफिक करण्याची गरज नाही. कारण मला स्वत:ला मराठी असण्याचा गर्व आहे. आपली संस्कृती, भाषा याबद्दल मला अभिमान आहे. माझ्या स्टँडअपमध्येही ते नेहमीच दिसतं. तेच तुम्हाला बिग बॉसच्या घरातही दिसेल. 

बिग बॉसमध्ये जातोय म्हटल्यावर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? 

मला नेहमीच घरच्यांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मी MBA केलं, मग स्टँडअप केलं. त्याच्यानंतर मी रेडिओमध्येही गेलो. पण, त्यांनी कधीच विरोध केला नाही. बिग बॉसमध्ये जातोय, हेदेखील त्यांना सांगितलं आहे. ते खूप उत्साही होते. पण, माझे आईवडील खूप साधे आहेत. त्यांना माहीत नव्हतं की मला इतके दिवस इथे राहायचंय. त्यांना वाटत होतं की दर रविवारी घरी यायला मिळेल. त्यामुळे त्यांना मला सगळं सांगून समजवावं लागलं. पण, इतक्या अनोळखी लोकांबरोबर राहायचं त्यामुळे त्यांना थोडं टेन्शन होतं. पण मला वाटतं ज्या गोष्टी तुम्ही चॅलेंज म्हणून स्वीकारता त्या जमून जातात. तेही समजूतदार आहेस. त्यांनी हाच सल्ला दिलाय की काहीही झालं तरी आपली संस्कृती विसरू नकोस. 

बिग बॉसच्या घरात खेळासाठी आणि टिकून राहण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक असतात असं तुला वाटतं? आणि तू कोणती स्ट्रॅटेजी केली आहेस का? 

मी कोणतीही स्ट्रॅटेजी केलेली नाही. स्ट्रॅटेजी केली की तुम्ही थोडे फेक वाटता. सगळे अनोळखी लोक आहेत. काही लोकांशी जमेल काहींशी नाही. ज्यांच्याशी जमेल त्यांच्याशी चांगली मैत्री करेन. काही लोकांशी नाही जमणार त्यांच्याशी बघू  कसं जमवायचं ते... मला वाटतं की या घरात आणि शोमध्ये टिकून राहायचं असेल तर तुमचे प्रत्येकाशी संबंध चांगले असले पाहिजेत. आणि तुम्ही थोडे डेडिकेटेड असायला हवं. 

तू स्वत: कधी बिग बॉस फॉलो केलंस का? मराठी किंवा हिंदीमधली स्पर्धकांकडून काही टिप्स घेतल्यास का? बिग बॉसमधील कोणता स्पर्धक तुझा फेव्हरेट राहिला आहे? 

बिग बॉस मी कधीच बघितलेलं नाही. या शोबद्दल लहानपणापासून माहितीये. माझ्या घरातही हा शो पाहतात. पण, मी कधीच पूर्ण सीझन बघितलेला नाही. त्यामुळे मी कोणाकडून टिप्सही घेतलेल्या नाहीत. कारण, मग त्यांचा जो अनुभव आहे त्यानुसार ते सांगणार. मी बिग बॉस पाहिलं नाही. पण सिद्धार्थ शुक्ला मला आवडायचा. त्याचे काही रील्स मी पाहिले आहेत. त्याची पर्सनालिटी मला आवडायची. 

स्टँडअप कॉमेडियन सोडून बिग बॉसच्या घरात तुझ्या पर्सनालिटीची कोणती बाजू पाहायला मिळेल? 

स्टँडअप कॉमेडियन सोडून लोकांना तुमची पर्सनालिटी माहीत नसते. मला वाटतं बिग बॉसमध्ये मी माणूस म्हणून एक व्यक्ती म्हणून कसा आहे हे लोकांना दिसेल. 

तुझ्या स्टँडअप कॉमेडीचा काही उपयोग होईल असं वाटतं का?

हो, मला वाटतं खूप उपयोग होईल. कारण, एवढं सिरीयस वातावरण असतं. इतके दिवस टीव्ही, फोन आणि मनोरंजनाशिवाय एकत्र राहायचंय. त्यामुळे मला वाटतं कॉमेडीमुळे घरातलं वातावरण थोडं हलकं होईल. 

'बिग बॉस'च्या घरात राहणं कठीण आहे असं वाटतं का? 

हो, बिग बॉसच्या घरात राहणं कठीण आहे. आपल्याला फोनची इतकी सवय आहे की कंटाळा आला की आपण फोन काढून रील्स बघत बसतो. तिथे या सगळ्या गोष्टी नाहीत. घड्याळ नसणार त्यामुळे वेळही कळणार नाही. सगळ्या गोष्टी स्वत:च्या स्वत: करायच्या आहेत. त्यामुळे कठीण आहे पण मला वाटतं काहीतरी नवीन करायला शिकायला मिळेल. 

बिग बॉस मराठीसाठी कधी विचारणा झाली होती का? नसेल तर, बिग बॉस मराठीमध्ये जायला आवडेल का? 

बिग बॉस मराठीसाठी मला कधी विचारलं नाही. आता माहीत नाही कधी विचारतील की नाही. पण, हो तिथे सगळे मराठी लोक असतील. त्यामुळे नक्कीच मला जायला आवडेल. 

प्रेक्षकांना काय आवाहन करशील?

प्रेक्षकांना मी हेच म्हणेन की तुम्ही बेस्ट आहात. आत्तापर्यंत मी जेवढी अपेक्षा केलीय त्याच्यापेक्षा प्रेक्षकांकडून मला नेहमी जास्तच मिळालंय. मग ते लाइव्ह शो असो किंवा सोशल मीडियावर कंटेट लाइक, शेअर आणि कमेंट करण्यापर्यंत असो प्रेक्षक नेहमीच पाठीशी उभे राहिले आहेत. माझ्यासाठी तेच सर्वकाही आहेत. आणि ते मला आताही सपोर्ट करतील, याची खात्री आहे. 

टॅग्स :बिग बॉसटिव्ही कलाकार