Join us  

अक्षय, अमिताभ यांच्यानंतर सलमान खान पडला मेट्रोच्या प्रेमात, अशाप्रकारे केले मेट्रोचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 5:35 PM

अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्यानंतर आता सलमान खान मेट्रोच्या प्रेमात पडला आहे.

ठळक मुद्देसलमानने सांगितले की, मी पहिल्यांदा मेट्रोत बसलो. खूपच मस्त वाटले. मी जितक्या जलद गतीने मेट्रोमुळे या पत्रकार परिषदेला पोहोचलो, तितकाच वेग बिग बॉस या कार्यक्रमाला असणार आहे.

बिग बॉस या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन गाजले आहेत. आता या कार्यक्रमाचा 13 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत झाली. पत्रकार परिषद म्हटली की, ती एखाद्या पंचतारांकित हॉटेल अथवा स्टुडिओमध्ये होते. पण बिग बॉसच्या पत्रकार परिषदेसाठी एक वेगळेच ठिकाण निवडण्यात आले. 

बिग बॉसची पत्रकार परिषद नुकतीच डी.एन.नगर या मेट्रो स्थानकाच्या यार्डमध्ये झाली आणि या परिषदेला चक्क या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि प्रेक्षकांचा लाडका भाईजान चक्क मेट्रोने आला. मेट्रोने प्रवास करण्याचा सलमानचा हा पहिलाच अनुभव होता. सलमानने त्याच्या या मेट्रोप्रवासाच्या अनुभवाविषयी पत्रकार परिषदेत आल्या आल्या उपस्थितांना सांगितले आणि मेट्रोचे भरभरून कौतुक केले. सलमानने सांगितले की, मी पहिल्यांदा मेट्रोत बसलो. खूपच मस्त वाटले. मी जितक्या जलद गतीने मेट्रोमुळे या पत्रकार परिषदेला पोहोचलो, तितकाच वेग बिग बॉस या कार्यक्रमाला असणार आहे. बिग बॉस हा कार्यक्रम हा प्रेक्षकांना तीन महिने पाहायला मिळतो. पण चार आठवड्यानंतर आता या कार्यक्रमात एक ट्विस्ट येणार आहे. या सिझनमध्ये प्रेक्षकांना खूप सारे सरप्राईज मिळणार आहेत.

सलमानच्याआधी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांनी देखील मेट्रोचे कौतुक केले होते. अक्षयने मेट्रोने घाटकोपर ते वर्सोवा प्रवास करतानाचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओत त्याचा मेट्रोने प्रवास करण्याचा अनुभव कसा आहे याविषयी सांगितले होते. तो या व्हिडिओत बोलताना दिसत होता की, प्रचंड ट्रॅफिक असल्याने आम्हाला वर्सोवाला पोहोचायला गाडीने दोन तास तरी लागले असते. त्यामुळे गुड न्यूज या चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी मेट्रोने प्रवास करायचे सुचवले. त्यामुळे आम्ही मेट्रो पकडली. मी सध्या मेट्रोतच असून मी एका कोपऱ्यात उभा आहे. पण येथील काही लोकांनी मला ओळखले आहे. मी केवळ दोन सिक्युरीटी गार्ड घेऊन मेट्रोने प्रवास करत आहे. मला पोहोचायला आता फक्त 20 मिनिटे लागणार आहेत. मेट्रो ही एकच सुविधा आहे, जी पावसात देखील सुरू असते. पावसात पाणी जमले तरी त्याचा परिणाम मेट्रोच्या सेवेवर होत नाही. 

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट केले होते की, माझ्या जवळच्या एका मित्राला तात्काळ रुग्णालयात जायचे असल्याने त्याने कार ऐवजी मेट्रोचा मार्ग स्वीकारला. तसेच मेट्रोने प्रवास करून रुग्णालयातून घरी परतल्यानंतर मित्राने मेट्रो खूप जलद आणि सोईस्कर असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे प्रदूषणावर जास्तीत जास्त झाडे लावा हाच उपाय असून मी माझ्या बागेत झाडे लावली आहेत, तुम्ही लावलीत का? असा सवाल उपस्थित करून मेट्रो कारशेडला विरोध करणाऱ्यांना टोला देखील लगावला होता.

 

टॅग्स :बिग बॉससलमान खानअक्षय कुमारअमिताभ बच्चन