Bigg Boss 11: म्हणून बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सामील होण्याची दबंग सलमानला भीती वाटते ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 10:04 IST
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉसमध्ये सामील होण्याची अनेकांची इच्छा असते. आता बिग बॉस-11 येत्या रविवारपासून रसिकांच्या भेटीला येणार ...
Bigg Boss 11: म्हणून बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सामील होण्याची दबंग सलमानला भीती वाटते ?
छोट्या पडद्यावरील रियालिटी शो बिग बॉसमध्ये सामील होण्याची अनेकांची इच्छा असते. आता बिग बॉस-11 येत्या रविवारपासून रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या शोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या शोमध्ये कोण कोण सेलिब्रिटी असणार, सामान्य जनतेमधील कोण कोण प्रतिनिधी असणार याबाबतच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यासाठी रसिकांना काही तास प्रतिक्षा करावी लागणार असंच दिसतंय. या शोमध्ये सामील व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सामान्य जनता असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येकालाच बिग बॉसच्या घरात सदस्य म्हणून दाखल व्हावं असं वाटतं. मात्र या शोचा होस्ट आणि अभिनेता सलमान खान याला मात्र या घरात स्पर्धक म्हणून दाखल होणं आवडत नाही. खुद्द सलमान खानने मुंबईत बिग बॉस-11च्या लॉन्चिंगच्यावेळी याचा खुलासा केला आहे. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना 90 दिवस राहावं लागतं. मात्र बिग बॉसच्या घरात आपण दोन दिवससुद्धा काढू शकत नाही. तसंच बिग बॉसच्या घरात राहिलोच तर लगेच लोणावळ्याच्या जेलमध्ये जावं लागेल असंही सलमानने सांगितले. बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांमध्ये प्रत्येक सीझनमध्ये कोणते ना कोणते वाद, भांडणं रंगतात. शोमध्ये एकमेंकावरील रागही स्पर्धक व्यक्त करत असतात. त्यामुळे कदाचित सलमानला आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं शक्य होणार नाही आणि बिग बॉसच्या घरातील स्पर्धकासह कोणत्या ना कोणत्या वादामुळे जेलमध्ये जाण्याची भीती कदाचित सलमानला वाटत असावी. त्यामुळेच या शोमध्ये स्पर्धक म्हणून दाखल होणं आवडत नाही असं सलमानने सांगितले. बिग बॉस-11च्या लॉन्चिंगच्यावेळी सलमानने शोचा नेहमीचा जो फॉरमॅट आहे त्यावरही नाराजी व्यक्त केली. बिग बॉस शोमध्ये दर आठवड्याला कोणता ना कोणता स्पर्धक घराबाहेर जात असतो. स्पर्धकांनी घराबाहेर जाण्याची म्हणजे इव्हिक्शनची सुरुवात पहिल्या आठवड्यापासूनच होते. मात्र यावर सलमानने नाराजी व्यक्त केली आहे. बिग बॉसच्या नव्या सीझनच्या पहिल्या आठवड्यातच इव्हिक्शन होऊ नये असं मतही सलमानने यावेळी व्यक्त केले. आता सलमानच्या या मताशी शोचे निर्माते कितपत सहमत होतात याबाबत उत्सुकता आहे. सलमानच्या सांगण्यावरुन पहिल्या आठवड्याचं इव्हिक्शन रद्द होणार का याची उत्कंठा नक्कीच आहे.