टीव्ही मालिकेसाठी कपडे डिझाइन करणाºया नीरूशा निखतने ट्विटच्या माध्यमातून हिना खानच्या स्टाइल स्टेटमेंटवर काही प्रश्न उपस्थित केले. काही दिवसांपूर्वीच घरात एंट्री केलेल्या रोहन मेहराने हिना खानला स्टाइल आयकॉन म्हटले होते. त्याला उत्तर देताना नीरूशाने लिहिले की, ‘प्रिय रोहन, हिना खान आणि स्टाइल आयकॉन? १५० नाइट सूट, ५० शूजच्या जोड्या १०० ड्रेसेज वाह... गोळा करून तर कोणीही आयकॉन बनू शकतो. नशीब... मी तिला माझे कपडे दिले नाहीत. मला आयुष्यभर याची खंत असेल.
काही दिवसांपूर्वीच रोहन मेहरा बिग बॉसच्या घरात गेला होता. यावेळी त्याच्या आॅनस्क्रीन आई हिना खानचे कौतुक करताना त्याने म्हटले होते की, ‘तू स्टाइल आयकॉन बनली आहे.’ हिच बाब नीरूशाला खटकल्याने त्यांनी तिची पोलखोल केली. यावेळी नीरुशाने हिना खानच्या स्टायलिशचा स्क्रीनशॉटही पोस्ट केला. ज्यामध्ये ती हिना खानसाठी कपडे मागत आहे. या स्क्रीनशॉटनुसार हिना खानने शोमध्ये एंट्री करण्याअगोदर तिच्या स्टायलिस्टने अनेक डिझायनर्सला मॅसेजेस् करून परत देण्याच्या बोलीवर कपड्यांची मागणी केली. हा मॅसेज नीरूशालादेखील आला होता. मात्र तिने कपडे देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला होता.
असो, नीरूशाच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे सांगणे मुश्किल असले तरी, हिना खानची स्टायलिस्ट हेमलता परिवाल दररोज तिने परिधान केलेल्या आउटफिट्सचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत असते. दररोज हिना कोणत्या डिझायनरचे ड्रेस आणि ज्वेलरी परिधान करते त्याची माहिती ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांना देत असते. हिंना खानला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून लोकप्रियता मिळाली आहे.